0
बीड - जुन्या वादातून दोन गटांत उद््भवलेल्या वादानंतर दोन्ही गटांकडील नागरिकांत झालेल्या मारहाणीत एका तरुणाला भोसकून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार बीड तालुक्यातील नवगण राजुरीत गुरुवारी दुपारी घडला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत तरुणाच्या नातेवाइकांनी घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, राजुरीमध्येही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राजुरी येथील गणेश नारायण बहिर (३०) हा तरुण ऊसतोड मुकादम म्हणून व्यवसाय करत होता. भावकीतीलच संजय बहिर व अन्य जणांसोबत वर्षभरापासून त्यांचा वाद सुरू होता. याच वादातून वर्षभरापूर्वी गणेश यांची चारचाकी गाडीही जाळण्यात आली होती. दरम्यान, हा वाद धुमसत होता. गुरुवारी दुपारी राजुरी बसस्थानक परिसरात पुन्हा काही कारणांवरून गणेश बहिर व संजय बहिर यांच्यातील वाद उफाळून आला. दोघांच्याही गटाचे लोक समोरासमोर आले आणि एकमेकांना मारहाण करू लागले काही जणांकडे फायटर, कुकरी, चाकू असे शस्त्रही होते
दरम्यान, यातच संजय याने गणेश बहिर याच्या छातीत कुकरीसारख्या चाकूने वार केला. हा वार वर्मी लागल्याने गणेश याचा मृत्यू झाला. दरम्यान, नागरिकांनी रिक्षातून गणेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नातेवाईक आक्रमक, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान, गणेशच्या मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही आणि मृतदेहही ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. या वेळी झेडपी सदस्य संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली, तर अपर पोलिस अधीक्षक कलुबर्मे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पाळवदे यांनी रुग्णालयात तळ ठोकून नातेवाइकांचे जबाब नोंदवले.
रुग्णालयात गर्दी गणेशच्या खुनाची माहिती मिळताच राजुरीसह परिसरातील गावांमधूनही शेकडो लोकांनी व नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली होती. यामुळे शिवाजीनगर व शहर पोलिसांनी रुग्णालयात बंदोबस्त वाढवला होता.
गावात तणाव, पोलिस बंदोबस्त भावकीमध्येच हा वाद होऊन खुनाची घटना घडल्यानंतर राजुरीत तणाव निर्माण झाला होता. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजुरी येते. मात्र, कपिलधार यात्रा सुरू असल्याने ग्रामीण ठाण्याचे सर्व पोलिस या बंदोबस्तात होते. यामुळे शहर पोलिस ठाण्याचे एपीआय नितीन पगार यांना पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांनी तत्काळ राजुरीत पाठवून तिथे बंदोबस्त तैनात केला.
News about navgan rajuri murder

Post a comment

 
Top