0
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एरवी आकाशकंदील म्हणजे दुर्लभ गोष्ट. याच भागातील मोरबाग शाळेच्या मुलांनी नवनिर्मितीचा प्रत्यय देताना स्वतः आकाशकंदील तयार केले आहेत. त्यातून यंदाच्या दिवाळीत प्रथमच येथे घरे आकाशकंदीलाच्या प्रकाशात उजळणार आहेत.
 मोरबाग हे सातारा तालुक्यातील ठेसेघर जंगल परिसरातील एक छोटसं गाव असून गावाचा समावेश दुर्गम भागात होतो. अशा गावातील शाळेत अलीकडेच आकाशकंदील तयार करण्याची आगळीवेगळी कार्यशाळा झाली. ती सर्वांसाठी कैतुकाचा विषय बनली. एरवी इथल्या मुलांसाठी आकाशकंदील ही तशी दुर्लभ गोष्ट. मात्र यंदाच्या दिवाळीत मुलांनी स्वतःच्या हातांनी बनविलेल्या आकाशकंदिलाची भेट घरच्यांना दिली आहे. गणेश शिंदे हे हरहुन्नरी शिक्षक त्यांनी याकामी पुढाकार घेतला. श्री. शिंदे यांनी यापूर्वी विविध कार्यानुभव कार्यशाळांतून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी मुलांना आकाशकंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यासाठी फाईलकार्ड पेपर, टिंटेड पेपर, फ्लोरोसन पेपर, पताका पेपरचा वापर केले. त्यातून अत्यंत आकर्षक आकाशकंदील तयार झाल्याचे पाहून मुलांचे चेहरे हरखले. मुख्याध्यापक विश्वास कवडे, राहुल सावंत, विजय कदम यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख दादाजी बागूल, शाळा समितीच्या अध्यक्ष छाया माने, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

 
Top