0

येथे सुरु असलेल्या चायना ओपन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार व तिसऱया मानांकित पी. व्ही. सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, पुरुष दुहेरीत सात्विकराज व चिराग शेट्टी या भारतीय जोडीचे आव्हानही उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. सिंधू व श्रीकांतच्या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूला चीनच्या आठव्या मानांकित ही बिंगजाओने 17-21, 21-17, 15-21 असे पराभूत केले. विशेष म्हणजे, ही बिंगजाओविरुद्ध सिंधूचा सलग तिसरा पराभव ठरला. याआधी पेंच ओपन व इंडोनेशिया ओपनमध्ये बिंगजाओने सिंधूला पराभूत करण्याची किमया साधली होती. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया बिंगजाओने पहिला गेम 21-17 असा जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण, अनुभवी सिंधूने जोरदार पुनरागमन करताना दुसरा गेम 21 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. अर्थात, ही विजयी लय तिला तिसऱया गेममध्ये राखता आली नाही. तिसऱया गेममध्ये बिंगजाओने नेटजवळ सरस खेळाचे प्रदर्शन करताना सिंधूला चुका करण्यास भाग पाडले. अखेरीस, तिने हा गेम 21-15 असा जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
किदाम्बी श्रीकांतही स्पर्धेबाहेर
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांतलाही पराभवाचा सामना करावा लागला. चिनी तैपेईच्या तिसऱया मानांकित चोऊ तियानने श्रीकांतला 21-14, 21-14 असे सरळ गेम्समध्ये पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. अवघ्या 35 मिनिटे चाललेल्या या लढतीत तियानने वर्चस्व गाजवतना श्रीकांतला वरचढ होण्याच संधीच दिली नाही.
याशिवाय, पुरुष दुहेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विकराज-चिराग शेट्टी जोडीला इंडोनेशियाच्या मोहम्मद असाम व हेंद्र सेतिवान जोडीने 11-21, 21-16, 12-12 असे नमवले. या विजयासह इंडोनेशियाच्या या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू, श्रीकांत तसेच पुरुष दुहेरीत सात्वि व चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताच्या या स्पर्धेतील आशा संपुष्टात आल्या आहेत.

Post a Comment

 
Top