0
भव्य 13 मजली आलिशान ‘क्वीन मेरी ट’t बोट, प्रत्येक मजल्यावरील विविध दालने, स्पा, थिएटर आणि या बोटीवरुन साडेसहा हजार प्रवाशांनी केलेला 22 दिवसांचा प्रवास, प्रख्यात लेखिका व  व्याख्यात्या  डॉ. मीना प्रभू यांनी आपल्या व्याख्यानातून घडवला.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. बेळगाव यांच्या वतीने डॉ. मीना प्रभू यांच्या  उत्तरोत्तर या नूतन पुस्तकाचा परिचय व क्वीन मेरी टू या जगातील अतिविशाल बोटीवरुन केलेल्या प्रवास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शाहू स्मारक भवन येथे सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी   ‘तरुण भारत’ चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर, निवासी संपादक मनोज साळुंखे, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे संचालक गजानन धामणीकर, शेवंतीलाल शहा, कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक अभिजित संभाजी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्वीन मेरी टू या बोटीवरील प्रवास आणि नॉर्वे या देशाचे वर्णन करताना डॉ. प्रभू यांनी एकप्रकारे श्रोत्यांना सहल घडवली. त्या म्हणाल्या, जीवनात उत्तर ध्रुवावर जाण्याची इच्छा झाली. क्वीन मेरी टू या बोटीचा हा 22 दिवसांचा प्रवास होता. विविध देशातील साडेसहा हजार प्रवासी या बोटीतून प्रवास करताना त्यांच्याशी आपण कसे जोडले जातो आणि रममाण होतो याचे वर्णन केले. या बोटीची लांबी 400 मीटर इतकी अवाढव्य होती. बोटीच्या 11 व्या मजल्यावरील 1111 या क्रमांकाचा सूट आपल्याला मिळाला होता. यावेळी प्रभू यांनी बोटीवरील अनुभव  सांगताना क्षणचित्रातून बोटीवरील दृश्य जिवंत केले. या बोटीचा पहिला मुक्काम हॅम्बुर्गला होता. या शहराची ओळख आणि वैशिष्टय़े त्यांनी सांगितली. त्यानंतर नॉर्वेची राजधानी असलेल्या ‘ऑस्लो’या शहराची  ओळख करुन देताना हे शहर म्हणजे नॉर्वेचा  इतिहास असल्याचे सांगितले. नॉर्वेमध्ये एक किलोमीटरच्या परिघात  फक्त 11 लोक राहतात. त्यामुळे या देशाचे दरडोई उत्पन्न मोठे आहे. या शहरातून शांततेचे ‘नोबेल’ प्रदान केले जाते. नोबेल हॉल या ठिकाणी असला तरी या हॉलमध्ये नोबल यांचा पुतळा नाही. कारण नोबल हा स्विडिश नागरिक होता. स्विडनने यापूर्वी नॉर्वेवर राज्य केले आहे. यामुळे नोबल यांचा पुतळा नाही.
            विग्लन पार्क म्युझियम आणि शिल्पे-
विग्लन पार्क म्युझियम मध्ये नग्न शिल्पे आहेत. पण या एकाही शिल्पात अश्लीलता दिसत नाही. नात्यातील भाव या शिल्पातून स्पष्ट होतो असे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी पु.ल. देशपांडे व सुनिता देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या सहलीची आठवण सांगितली.
चौकट
           मध्यरात्रीचा सूर्य –
बर्गन, आलेसुंड, अंजन्ससेन्स असा प्रवास करत त्या उत्तर धुवावर पोहचल्या. त्याठिकाणी केवळ बर्फ होता.बर्फातून तयार केलेले बार याठिकाणी पहायला मिळाले. या प्रवासातील शेवटचा क्षण म्हणजे नॉर्थ केप.  नॉर्थ केपला अंधार होत नाही. सर्वत्र लखलखीत प्रकाश पडलेला असतो. रात्री 7 वाजता सूर्य दिसतो. त्यावेळी थोडा अंधार असतो. पण त्यानंतर मात्र पुन्हा सूर्यप्रकाश पडतो. ज्यावेळी रात्रीचे 12 वाजतात त्यावेळी हा मध्यरात्रीचा सूर्य पाहणे म्हणजे वेगळा आनंद व अनुभती असते. यावेळी आकाशातील रंगही वेगवेगळया स्वरुपाचे असतात त्यामुळे भान हरपून आपण वेगळया विश्वात जातो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘तरुण भारत’ चे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी स्वागत करुन डॉ. मीना प्रभू यांचा प्रवास आणि त्यांनी केलेल्या लिखाणाची माहिती दिली. अनुराधा तेंडुलकर यांच्या हस्ते डॉ. प्रभू यांचे स्वागत करण्यात आले.  कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक अभिजित संभाजी यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे संचालक गजानन धामणीकर, शेवंतीलाल शहा यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ऍड. प्रसन्न मालेकर यांनी तर  आभार अभिजित संभाजी यांनी मानले. यावेळी लोकमान्यचा सर्व स्टाफ, क्वेस्ट टूर्सचा स्टाफ यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते

Post a Comment

 
Top