0
नवी दिल्ली - देशभरातील तीन हजारांहून अधिक साधू-संतांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, असा धर्मादेश रविवारी दिला. या मुद्द्यावर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. या स्थितीत सरकारने कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा. हे शक्य नसेल दुसरा मार्ग शोधून मंदिर उभारावे, असे संतांनी म्हटले आहे. अखिल भारतीय संत समितीने दिल्लीत दोनदिवसीय धर्मादेश संत संमेलनाचे आयोजन केले होते.

यात रविवारी दुसऱ्या दिवशी समितीचे अध्यक्ष जगद््गुरू रामानंदाचार्य हंसदेवाचार्य यांनी धर्मादेशाचे वाचन केले. राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वतींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “राममंदिरासाठी सरकारने कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा. हाच संतांचा धर्मादेेश आहे.’ राममंदिरावरून जनभावना संतप्त आहे. यासाठी लवकर सुनावणी घ्यावी, असा आग्रह सरकार सुप्रीम कोर्टाला करू शकते, असेही ते म्हणाले. धर्म, संस्कृती, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय स्वाभिमान या मुद्द्यांवर सरकारची भूमिका समाधानकारक असल्याचे नमूद करून राममंदिराबाबत नाराजी असल्याचे स्वामींनी सांगितले.
१९९२सारख्या आंदोलनाचा दिलेला इशारा धोकादायक : मुस्लिम बोर्ड
लखनऊ | ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने १९९२ सारखे आंदोलन सुरू करण्याचा रा. स्व. संघाने दिलेला इशारा धोकादायक असल्याचे म्हटले आहे. राममंदिराची मागणी पुन्हा जोर धरत असली तरी यामागे राजकारण असल्याचे बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी म्हटले आहे. २०१९च्या निवडणुकीसाठी हा राजकीय दबावाचा भाग आहे, असे रहमानी म्हणाले.
स्वामी जितेंद्रानंद सरस्वतींनी सांगितले, मंदिराबाबत जनमत घडवण्यासाठी संत देशभर दौरे करतील. २५ नोव्हेंबरला अयोध्या, नागपूर आणि बंगळुरूत संतांच्या महाधर्मसभा होतील. नंतर ५०० जिल्ह्यांत सभा होतील. ९ डिसेंबरला दिल्लीत सभा होणार आहे. यात दहा लाखांवर लोक येतील.
... तर हिंदू असहिष्णू होईल : उमा भारती
हिंदू जगात सर्वात सहिष्णू आहे. मात्र, अयोध्येत राममंदिराजवळ मशीद उभी करण्याच्या गोष्टींमुळे हिंदू असहिष्णू होऊ शकतात. मंदिराची पायाभरणी करण्यासाठी राहुल गांधींसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अयोध्येत यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे. अयोध्येत श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावावर उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांनी म्हटले आहे की, ही मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा दुप्पट उंच असायला हवी.
Ordinance to remove temple; Sadhus-Saints' commandments too !

Post a Comment

 
Top