0
खेड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शांने पावन झालेल्या अन्‌ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुंभाड येथील माळरानावर सातगाव ग्रामस्थांच्या सहभागातून १९२९ मध्ये शिवस्मारकाची उभारणी केली. याच ठिकाणी नव्या स्वरूपातील शिवस्मारक साकारण्यात येणार आहे.शिवस्मारक परिसराचे सुशोभिकरण, क्रीडा संकुल व पर्यटनस्थळ विकसन संकल्प हाती घेण्याचे ग्रामस्थांनी निश्‍चित केले आहे. यामुळे लवकरच हे गाव पर्यटनाच्या नकाशावर झळकणार आहे. 
सातगाव पंचक्रोशीची संरक्षण व क्रीडा क्षेत्रातील परंपरा आणि निसर्गांचे वरदान लाभलेल्या कुंभाड येथील परिसराला छत्रपती शिवाजी महारांजाचा पदस्पर्श झाला आहे. (कै.)अनंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव, खोपी, कुंभाड, मिर्ले -तांबड, बिजघर, कुळवंडी व तिसंगी येथील ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून ८९ वर्षापूर्वी येथे शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली.
कोल्हापूर संस्थानच्या तत्कालीन क्षात्र जगद्‌गुरूंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. कोल्हापूर नंतर शिवप्रभूंचे अश्‍वारूढ शिल्प उभारण्याचा बहुमान सातगाव पंचक्रोशीला मिळाला होता. १९५२ मध्ये आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जनरल जगन्नाथ भोसले यांनी नव्या स्वरूपात शिवस्मारक उभारण्याची संकल्पना मांडली होती.
विविध कार्यक्रम होतात साजरे
या स्मारकात शिवप्रभूंना मानवंदना देऊन शिवजंयती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दत्तजयंती यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. जिल्हा व राज्यस्तरीय कबड्डी, हॉलीबॉल, शुटींग बॉल, खो - खो आदी सामनेही आयोजित केले जातात.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने १९९६ मध्ये रौप्यमहोत्सव साजरा केला होता.
१९७२ मध्ये गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या हस्ते देखण्या अश्‍वारूढ शिवस्मारकाचे अनावरण झाले होते. कुंभाड गावच्या प्रवेशव्दाराजवळ हा विस्तीर्ण परिसर असून, दक्षिणेकडून बारमाही वाहणारी  डुबी नदी आहे.

Post a Comment

 
Top