0
शिर्डी - दीडशे वर्षांपूर्वी साईबाबांनी दिलेल्या 'सबका मालिक एक' या संदेशामुळे शिर्डी सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान बनली. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून भाजपच्या विश्वस्तांनी येथील रूढी-परंपरा पायदळी तुडवत साईमंदिराचे भगवेकरण सुरू केले होते. 'दिव्य मराठी'ने २५ नाेव्हेंबरच्या अंकात यावर यावर प्रकाश टाकल्यानंतर अाक्रमक झालेल्या शिर्डीकर ग्रामस्थांनी साेमवारी त्याविराेधात आवाज उठवला. त्यामुळे संस्थानने तातडीने द्वारकामाई मंदिर असा लावलेला बोर्ड हटवला.

साई मंदिरातील भगवे बोर्ड हटवून पूर्वीप्रमाणेच लावावेत व द्वारकामाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर पूर्वीप्रमाणेच द्वारकामाई मशीद बोर्ड लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे केली. मंदिर व परिसरातील भगवे बोर्ड हटवण्यासाठी ग्रामस्थांनी संस्थानला आठ दिवसांचा कालावधी दिला असून यादरम्यान कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करून बोर्ड हटवण्याचा इशारा दिला.


साई संस्थानने स्थापनेपासून साईबाबांची शिकवण, आदर्शांची जोपासना केली. परंतु, २००४ मध्ये राज्य सरकारने साईबाबा संस्थान ताब्यात घेतल्यानंतर एक नियमावली तयार करून तिला घटनात्मक दर्जा दिला. तिचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश सरकारने विश्वस्त व प्रशासनाला दिले. नियमावलीत साईबाबांची शिकवणूक, आदर्श, संदेशाचे पालन करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे अधोरेखित करण्यात आले.

अन्यथा आम्ही बोर्ड हटवू 
संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे हे संघ व भाजपच्या विचाराचे असल्याने ते साईबाबांना भगव्या रंगात आणून मंदिराचे हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत खोटे बोलून हावरे साईभक्त व शिर्डीकरांची दिशाभूल करीत आहेत. समाधी शताब्दी वर्षात लावलेल्या फलकावर फक्त ओम आणि त्रिशूल ही प्रतीके लावून हावरेंनी सरकारच्या नियमावलीची पायमल्ली केली आहे. द्वारकामाई मज्जिद हा बोर्ड काढून द्वारकामाई मंदिर असा बोर्ड लावून हावरे व विश्वस्तांना नेमके काय साध्य करायचे आहे. आठ दिवसांत हावरेंनी साई मंदिर व संस्थानच्या सर्व इमारतींतील भगवे बोर्ड काढून टाकावे अन्यथा आम्ही शिर्डीकर हे बोर्ड काढून टाकू, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा संस्थानचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी दिला.

भगवेकरणाचा हेतू नाही 
मंदिर भगवीकरणाचा संस्थानचा कोणताही हेतू नाही. 'सबका मालिक एक' हा संदेश विश्वव्यापी व्हावा अशा दृष्टीने प्रयत्न आहे. द्वारकामाई मंदिर असा लावलेला बोर्ड भाविकांच्या भावना लक्षात घेऊन काढण्यात आला आहे. भगव्या बोर्डबाबतचे निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्याचे सुचवले आहे, असे स्पष्टीकरण माजी विश्वस्त तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी दिले.

विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी : साईबाबा संस्थानने साईबाबांचे भगवीकरण करून देशातील व विदेशातील करोडो साईभक्तांचा विश्वासघात केला. जगाला एकात्मतेचा संदेश देणाऱ्या द्वारकामाई मज्जिदचा बोर्ड द्वारकामाई मंदिर असा केल्याने हावरे यांच्या हिंदुत्वाचा चेहरा जगासमोर आला आहे. राज्य सरकारने करोडो साईभक्तांच्या भावनेचा विचार करून संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर पाटील यांनी केली.

असे झाले अाहेत बदल

गेल्या दोन वर्षांपासून साईमंदिर व परिसरातील पूर्वीचे दिशादर्शक व माहितीचे सर्व फलक हटवून भगव्या रंगाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. समाधी शताब्दी वर्षात राष्ट्रपतींच्या हस्ते लेंडीबागेत स्तंभाची उभारणी करण्यात आली. त्यावर सर्व धर्मांची प्रतीके असायला हवी होती. मात्र, येथे फक्त एका धर्माचे प्रतीक लागले आहे. पूर्वीपासून द्वारकामाई मज्जिद असे नाव असताना अचानक द्वारकामाई मंदिर असा बोर्ड लावण्यात आला. साईंच्या विचारांनाच तडा देण्यात काम दोन वर्षांपासून सुरू असल्याने शिर्डीकर व साईभक्तांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. साईसच्चरित्र व साईलीला मासिकाच्या मुखपृष्ठावरील 'सबका मालिक एक' हा संदेशही काढण्यात आला असून, तेथे 'ओम साईनाथाय नम:' असा नवीन संदेश आला आहे.

विश्वस्त मंडळापुढे मागण्या मांडणार 
संस्थानच्या प्रकाशनांची तपासणी केल्यानंतर २००१ पासून 'ओम साईनाथाय नम:' असा संदेश असल्याचे निदर्शनास आले. द्वारकामाई मशीद असा उल्लेख माहितीफलकावर आहे. मात्र, एका बोर्डवर द्वारकामाई मंदिर उल्लेख असल्याचे आढळून आले असून तो बोर्ड तातडीने हटवला. बोर्ड काढण्याची मागणी विश्वस्त मंडळापुढे मांडली जाईल. - रुबल अग्रवाल- गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान

विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Shirdi sai sansthan news

Post a Comment

 
Top