0
  • Jitendra Awhad visits Uddhav Thackeray for the second timeमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या महिनाभरात जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


   विविध सामाजिक व राजकीय विषयांवर आव्हाड यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ब्लॉग्जचे संकलन करून ‘उग्रलेख’ नावाचे पुस्तक येऊ घातले आहे. त्याच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात आले. महिनाभरापूर्वीही आव्हाडांनी याच सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ठाकरेंची भेट घेतली होती. येत्या १८ नोव्हेंबरला ठाण्यात हे प्रकाशन होणार आहे. त्याचे औपचारिक निमंत्रण देण्यासाठी आपण मातोश्रीवर गेल्याची माहिती आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.
   विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या महिनाभरातील ही दुसरी भेट आहे.

   सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब हेदेखील उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमंत्रणाचे निमित्त असले तरी राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता आव्हाड आणि ठाकरे या दोघांत राजकीय विषयावर चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जात आहे.

   शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे एकाच व्यासपीठावर 
   या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित राहणार असल्याने पवार, ठाकरे व शिंदे अशी राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेने हाती घेतलेला राम मंदिर उभारणीचा मुद्दा, दुष्काळी परिस्थिती अशा मुद्द्यांवर शिवसेनेने भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. त्यातच हिवाळी अधिवेशन पाहता या कार्यक्रमात हे नेते काय भाष्य करतात याबाबत उत्सुकता आहे.

Post a Comment

 
Top