0
निवडणुकीतील गोंधळ, फाटाफूट याचा फटका काळय़ादिनाला बसेल अशी शक्मयता व्यक्त होत असतानाही हजारो संख्येने दाखल झालेल्या सीमावासियांनी बेळगाव शहरातील काळादिन यशस्वी केला. ईव्हीएम घोटाळय़ाने विजयी झालेल्यांच्या मागे जनता नाही. जनता पूर्णपणे सीमाप्रश्नाशीच निगडित आहे. मशीनची करामत करणाऱयांचे गुलाम नाही हेच यंदाच्या काळय़ादिनाने दाखवून दिले आहे. मागील वषीपेक्षाही अधिक संख्येने दाखल झालेले तरुण सीमाप्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीशी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करून गेले आहेत.
युवती आणि महिलांची संख्याही लक्षणीय
 मागील 62 वर्षांची परंपरा पाळत बेळगाव शहरवासियांनी गुरुवारी कडकडीत हरताळ पाळला. हजारोंच्या संख्येने मूक सायकलफेरीत सहभागी होत महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला. बालचमू ते   आबालवृद्धांपर्यंत अनेकजण गांभीर्याने सायकलफेरीत सहभागी झाले होते. यामध्ये युवती आणि महिलांची संख्याही लक्षणीय होती. हजारोंच्या संख्येने सीमावासीय सायकलफेरीत सहभागी झाले. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी आदी घोषणांचा गजर करतानाच कर्नाटकच्या जोखडात डांबणाऱया केंद्र सरकारचा आणि सक्तीचे धोरण अवलंबिणाऱया कर्नाटक सरकारचा मूक निषेध नोंदविण्यात आला. सायकल फेरीमध्ये युवावर्गाची संख्या प्रचंड होती. त्यामुळे पुन्हा एकदा युवावर्ग लढय़ासाठी एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.   
शहरात शुकशुकाट
समितीने हरताळ पाळण्याची हाक दिल्यामुळे शहापूर, वडगाव, शहर आणि टिळकवाडी परिसरातील अनेक व्यापाऱयांनी सकाळपासूनच आपापले व्यवहार बंद  ठेवले होते. त्यामुळे शहरात शुकशुकाट होता. सकाळी 8 वाजल्यापासूनच युवक व नागरिकांनी मूक फेरीसाठी ठिकठिकाणी जमण्यास प्रारंभ केला होता. शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी युवा मंच, शिवसेना, म. ए. समिती  महिला आघाडी व युवा समिती आदींच्या माध्यमातून लोक जमत होते.
शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत फेरीला सुरुवात झाली. शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, निंगोजी हुद्दार, प्रकाश मरगाळे तसेच इतर घटक समित्यांचे पदाधिकारी सुरुवातीपासूनच फेरीत सहभागी होते.
प्रश्न सुटेपर्यंत संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करा
फेरीच्या प्रारंभीच माध्यमांशी बोलताना किरण ठाकुर यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीस विलंब होत असून सीमाभागात कर्नाटक त्याचा फायदा घेत आहे. यामुळेच हा प्रश्न सुटेपर्यंत संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी मांडली. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकतीच बातचीत केली आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत केंद्राने ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी समितीच्या शिष्टमंडळाची भेट पंतप्रधानांशी करून द्यावी, ही मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासाठीची तयारी दर्शविली असून आपण लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
सकाळी 10 वाजता सायकलफेरीस प्रारंभ झाला. फेरीच्या अग्रभागी सीमाप्रश्नाचा इतिहास, मूक सायकलफेरीचा उद्देश, मार्ग तसेच पाळावयाची शिस्त सांगण्यासाठी ऑटोरिक्षा ठेवण्यात आली होती. समिती कार्यकर्ते महादेव पाटील यांनी रिक्षातून नागरिकांना मोठय़ा संख्येने सायकलफेरीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामागे समितीचे इतर नेते सहभागी झाले होते. त्यानंतर सायकलस्वार, पायी चालणारे, वाहनात बसलेल्या महिला आणि सर्वात मागे मोटारसायकलस्वार युवक  सहभागी झाले होते.

Post a Comment

 
Top