0
बेळगाव शहराला लागूनच असलेल्या हिंडाल्को परिसरात बिबटय़ाचे दर्शन घडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. गुरुवारी रात्री 11.15 च्या सुमारास हा बिबटय़ा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत वनविभाग व पोलिसांकडून बिबटय़ाला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू होती.
हिंडाल्को येथील सिंडिकेट बँकेच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत या बिबटय़ाची काही दृश्ये कैद झाली आहेत. एका कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबटय़ा दिसत आहे. तसेच या परिसरात सुरक्षा रक्षकाने बिबटय़ाला पाहिल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास एका कर्मचाऱयाच्या दृष्टीसही पडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शुक्रवारी सकाळपासून वन विभाग व पोलिसांची संयुक्त शोध मोहीम सुरू झाली. बिबटय़ा जरी शहरालगत आला असला तरी अद्याप त्याने कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही.
घटनेची माहिती कळताच उप वनसंरक्षणाधिकारी अमरनाथ, एसीएफ एस. एम. संगोळी, आरएफओ श्रीनाथ कडोलकर यांच्यासह पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच या बिबटय़ाच्या पायांचे ठसे तपासण्यात आले. पायांच्या ठशांवरून आता शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
महिन्याभरात तिसरी घटना
या महिन्याभरात बेळगाव तालुक्मयात बिबटय़ा सदृष्य प्राण्याचे दर्शन तीन वेळा  घडले आहे. देसूर कमलनगर परिसरात बिबटय़ा व बछडय़ांचे वास्तव्य आढळून आले. त्यानंतर काही दिवसातच कुदेमनी येथील शिवारात बिबटय़ा सदृष्य प्राण्याकडून एका कुत्र्याचा फडशा पाडण्यात आला होता. तर गुरुवारी रात्री हिंडाल्को परिसरात बिबटय़ाचे दर्शन घडल्याने एका महिन्यात तीन वेळा बिबटय़ाच्या वास्तव्याच्या घटना समोर आल्या आहेत. अन्नपाण्याच्या शोधात हे बिबटे शहराकडे कूच करत असल्याची चर्चा करण्यात येत आहे.
हिंडाल्कोचे आवाहन
हिंडाल्को वसाहत परिसरात बिबटय़ाचे अस्तित्व असल्याच्या माहितीमुळे येथील रहिवाशांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिंडाल्को व्यवस्थापनाने सुरक्षा विभाग सक्षम बनविला आहे. तसेच कोणासही मदतीची आवश्यकता असल्यास 9201 हा कंट्रोल रूम क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे तसेच गरजेच्या वेळी या क्रमांकावर संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

 
Top