0
विधानसभेत आपण नेहमीच ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सेवा आणि रखडलेल्या पाणी प्रश्नांबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यास सुरू केली आहे. या योजनेमुळे आपल्या प्रयत्नांना यश आले असून रस्ते झाले तरच ग्रामीण भागाचा गतिमान विकास होणे शक्य असल्याचे मत आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील 14 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
हाजगोळी फाटा ते पेद्रेवाडी दरम्यान होत असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हाजगोळी खुर्द, हाजगोळी बु।। व पेदेवाडी ग्रामपंचायतींच्यावतीने आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. दशरथ पंडीत यांनी प्रास्ताविकात आबिटकर यांनी हाजगोळी फाटा ते पेद्रेवाडी रस्त्यासाठी तब्बल 3 कोटी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. अतिशय दयनिय अवस्थेत असलेल्या या रस्त्याला निधी प्राप्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री सडक योजना ही उत्तम योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून चांगले रस्ते होत आहेत. ग्रामस्थांनीही कामाच्या दर्जाकडे लक्ष देऊन काम करून घ्यावे. शेतकऱयांना पाईपलाईन करताना रस्ता खुदाई करावा लागणार असेल तर रस्ता होण्यापूर्वीच पाईपालाईन टाकून घ्या. दर्जेदार होणाऱया रस्त्यांची पुन्हा वाताहत लागता कामा नये अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी शिवाजी पंडीत, भास्कर निकम, संजय येसादे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुनील शिंत्रे यांनी या मार्गावर हिरण्यकेशी नदीवर हाजगोळी व सरोळी असे दोन कोल्हापूर टाईप बंधारे आहेत. हे बंधारे पाणी अडविण्यासाठी बांधले असून सोय म्हणून यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी पूल उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी म्हणाले, ग्रामीण भागातील समस्यांची जाण असणारा अभ्यासू आमदार म्हणून आबिटकरांची ओळख आहे. आमची बांधिलकी विकासाशी असून विकास कामासाठी भरघोस निधी दिलेल्या आमदार आबिटकरांना पुन्हा आमदर करूया असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपाची युती होणार असून विकास कामे करणाऱया आमदार आबिटकरांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी हाजगोळी बु।। च्या सरपंच सौ. रोहीणी पंडीत, हाजगोळी खुर्दच्या सरपंच सौ. भादवणकर, पेद्रेवाडीच्या सरपंच सौ. लता रेडेकर, भादवण सरपंच संजय पाटील, आजरा कारखान्याचे संचालक जनार्दन टोपले, राजेंद्र सावंत, विलास नाईक तसेच रशिद पठाण, आप्पा खेडेकर, अनिरूद्ध रेडेकर, सुनील कातकर, रामदास चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते व हाजगोळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर देवकांडगाव ते तेजम वसाहत रस्ता (2 कोटी 69 लाख), पेरणोली ते वझरे (1 कोटी 98 लाख), देवर्डे अंतर्गत रस्ता व व्यायाम साहित्य (19 लाख), माद्याळ ते मेढेवाडी रस्ता (1 कोटी 8 लाख), वेळवट्टी गावांतर्गत रस्ते (7 लाख), वेळवट्टी फाटा ते गाव रस्ता (60 लाख), पारेवाडी ते पेठेवाडी रस्ता (1 कोटी 2 लाख), एरंडोळ ग्रामपंचायत इमारत (10 लाख), लाटगांव ते एरंडोळ रस्ता (2 कोटी 92 लाख) आदि कामांचा शुभारंभ करण्यात आला.

Post a Comment

 
Top