शहरातील जुना बसस्थानक परिसरातील युनायटेड क्लासिकमधील अलिझा ड्रेसर्सला शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या भीषण आगीत तयार कपडय़ांसह फर्निचर खाक झाले. शुक्रवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास लागलेल्या या आगीत सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची घटना नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा आजूबाजूच्या दुकांमध्ये आग पसरण्याचा धोका होता.
युनायटेड क्लासिक या इमारतीत अनेक गाळे असून त्यात कपडय़ांसह चप्पल व अन्य वस्तूंची दुकाने आहेत. येथील व्यापारी नेहमीप्रमाणे रात्री आपली दुकाने बंद करून घरी गेले. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री अलिझा ड्रेसर्समधून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकान मालक फैसल इक्बाल फजलानी (गोवळकोट रोड) यांना याबाबतची माहिती देण्यात आली.

नगर परिषदेच्या अग्नीशमन यंत्रणेनेद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत आतील कपडे व फर्निचर खाक झाले होते. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत फजलानी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून 12 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर तहसीलदार जीवन देसाई, मंडल अधिकारी यू. एल. जाधव, तलाठी यू. आर. राजेशिर्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनाम्यात फजलानी यांचे सुमारे साडेसहा लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Post a comment