कोल्हापूर :
बसंत-बहार टॉकीज ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडलगत असणार्या तीन अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बुधवारी पहाटेच्या सुमारास लागोपाठ सात बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. या टोळीत पाच ते सहा जणांचा समावेश असून, काही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनांनी स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बसंत-बहार रोडलगत असणार्या रॉयल हेरिटेजमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास चार चोरटे शिरले. तळमजल्यावर राहणारा वॉचमन सचिन पांढरबळे याच्या खोलीला बाहेरून कडी लावली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय व शरद मेहता यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप उचकटले. परंतु, मेहता यांच्या घरी काहीच हाती लागले नाही. मेहता कुटुंबीय बंगळूर येथे मुलाच्या घरी दिवाळी सुट्टीसाठी गेले आहेत. सकाळी त्यांच्या शेजार्यांच्या निदर्शनास ही चोरीची घटना आली.
खाद्यपदार्थांवर ताव
चोरट्यांनी नंदनवन पार्कमधील रो-बंगले लक्ष केले. नीलेेश रामचंद्र भोपळे यांच्या बंद बंगल्यात चोरटे शिरले. भोपळे यांच्या मुलीचे चार ते पाच हजार रुपयांचे पाकीट लंपास केले. मुलांसाठी आणलेले चॉकलेट, बिस्कीटे यासह खाद्यपदार्थांवर चोरट्यांनी ताव मारला. नंदनवन पार्कातील मोबाईल शोरूमच्या बॅक ऑफिसचे कुलूप तोडण्यात आले आहे. फॅन सुरू ठेवून चोरटे निघून गेले.
टपाल पेट्याही उचकटल्या
नंदनवन पार्कशेजारील दिप्ती हौसिंग सोसायटीत चोरटे पहाटे साडेचारच्या सुमारास शिरले. येथील वर्षा देसाई, विवेक सोळंकी यांच्यासह एका वकिलांच्या फ्लॅटचे कुलूप तोडण्यात आले. या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. तळमजल्यावर अडकविण्यात आलेल्या टपाल पेट्या उचकटण्यात आल्या.
चोरट्यांनी ठोकली धूम
दिप्ती पार्कातील सुनील कापसे यांच्या घराला दोन दरवाजे आहेत. एक दरवाजा बंद असतो. हा दरवाजा उचकटण्याचा आवाज ऐकून त्यांना जाग आली. लाईट लावून ते धाडसाने बाहेर आले. यावेळी चार ते पाच संशयित समोरील कंपाऊंडवरून उडी मारून जाताना त्यांनी पाहिले.
फ्लॅटना बाहेरून कडी
रॉयल हेरिटेज व दिप्ती हौसिंग सोसायटीमध्ये चोरी करताना चोरट्यांनी बंद फ्लॅट लक्ष्य केले. याचवेळी बाजूच्या फ्लॅटना बाहेरून कडी लावली होती.
तोंड बांधून प्रवेश
पहाटे साडेतीन ते पाचच्या सुमारास चोरटे या ठिकाणी शिरले होते. काहींनी तोंडाला रुमाल बांधले होते. हातात कटावणी, स्कू्र ड्रायव्हर असे साहित्य असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या चोरीमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Post a Comment