जम्मू-काश्मीर येथील अनंतनाग परिसरातील सीमारेषेवर भारतीय जवान व आतंकवाद्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चकमक सुरू होती. सुरू असलेल्या या चकमकीत भारतीय जवानांच्या तुकडीने आतंकवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना एका आतंकवाद्याला आस्मान दाखवत यमसदनी पाठविले. पण याचवेळी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय जवानाला वीरमरण आल्याने तो शहीद झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. प्रकाश पुंडलिक जाधव (वय 29 रा. बुदिहाळ, ता. निपाणी) असे शहीद वीर जवानाचे नाव आहे.
जम्मू-काश्मीर परिसरातील अनंतनाग भागात झालेल्या चकमकीत वीर जवान प्रकाश जाधव शहीद झाले. असा पहिला दूरध्वनी मंगळवारी पहाटे वडील माजी सैनिक पुंडलिक जाधव यांना भारतीय सैन्य दलाकडून आला. अचानक मुलगा शहीद झाल्याची दूरध्वनीवरून माहिती मिळताच जाधव कुटुंबियांचा विश्वास बसला नाही. यानंतर हे वृत्त बुदिहाळसह परिसरात वाऱयासारखे पसरले. वीर जवान प्रकाश सेवेत असणाऱया परिसरातील त्यांच्या मित्रांनीही घटनेला दुजोरा दिला. तोच निपाणी ग्रामीण पोलीस, तहसीलदार यांनीही घटनेला दुजोरा दिला. यानंतर जाधव कुटुंबियांसह संपूर्ण बुदिहाळ गाव शोकसागरात बुडाला.
वीर जवान प्रकाश जाधव आतंकवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाल्याचे वृत्त समजताच पै-पाहुणे, मित्र परिवार, सैन्य दलात सेवेत असणाऱया जवानांचे कुटुंबिय, ग्रामस्थ, महिला यांनी जाधव यांच्या निवासस्थानासमोर गर्दी केली होती. शहीद वीर जवान प्रकाश जाधव यांच्या पार्थीवाचे मंगळवारी सायंकाळी जम्मू-काश्मीर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. बुधवारी पार्थीवास शासकीय इतमामात मानवंदना दिल्यानंतर दिल्ली येथे विमानाने पाठविण्यात येणार आहे. दिल्ली येथे मानवंदना दिल्यानंतर पार्थीव विशेष विमामाने बेळगाव, गोवा, पुणे किंवा कोल्हापूर येथे आणण्यात येणार आहे.
बुदिहाळ गाव व परिसर या घटनेने शोकसागरात बुडाला आहे. पार्थिव येण्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून वातावरण सुन्न झाले आहे. शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्याची तयारी पूर्णत्त्वाला आली आहे. बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कारविधी व मानवंदना होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहीद वीर जवान प्रकाश यांच्या पश्चात पत्नी निकीता, वडील माजी सैनिक पुंडलिक, आई शारदा, भाऊ सचिन, भावजय श्रृतिका यांच्यासह अवघ्या तीन महिन्यांची मुलगी श्रावणी असा परिवार आहे.
याअगोदर दोनवेळा जखमी
वीर जवान प्रकाश जाधव हे सैन्य दलात भरती झाल्यापासून सीमेवर होणाऱ
या वेगवेगळ्य़ा कारवायांमध्ये अग्रेसर असायचे. याअगोदर एका चकमकीत त्यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. तर सीमेवरील बॉम्बस्फोटात ते जखमी होऊन आठ दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. यातून बचाव होताना त्यांचा पुनर्जन्मच झाला होता. या दोन घटनांतून बचावलेल्या जवान प्रकाश यांना तिसऱया वेळच्या हल्यात मात्र अमरत्व पत्करावे लागले. याबाबत बुदिहाळ गावात ठिकठिकाणी जवान प्रकाश अमर रहेचे फलक लावण्यात आले होते.

Post a Comment