0
सामना ऑनलाईन । मेलबर्न
ऑस्ट्रेलिया दौऱयावर सलामीच्या टी-20 क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानला पराभवाचा धक्का बसला. आता तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विराट कोहलीच्या सेनेची आज 23 नोव्हेंबरला अस्तित्वाची लढाई असेल. दुसरीकडे सलग दुसऱया विजयासह आधीच मालिका जिंकण्याच्या इराद्याने यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानावर उतरेल. मालिकेत 0-1 फरकाने पिछाडीवर पडलेली ‘टीम इंडिया’ उद्या संघात काही बदल करणार काय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
लोकेश राहुल, कृणाल पंडय़ाचे करायचे काय?
लोकेश राहुलचा खराब फॉर्म हिंदुस्थानी संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमधील टी-20 सामन्यात शतक ठोकणाऱया राहुलला त्यानंतर सलग सहा लढतींत 30 धावांच्या पुढेही जाता आलेले नाही. याचबरोबर कृणाल पंडय़ाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले, मात्र त्याने 4 षटकांत 55 धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीवर तब्बल सहा षटकार ठोकण्यात आले. याचबरोबर क्षेत्ररक्षणातील गाफीलपणाही भोवला. स्वतः कर्णधार विराट कोहलीने ऍरोन फिंचचा झेल सोडला, तर डीपला चेंडू अडवताना चूक केली. मेलबर्नची खेळपट्टीही गब्बासारखीच असल्याने फिरकीपटू युजवेंद्र चहलला उद्या संधी मिळू शकते. मात्र कृणाल पंडय़ाला खाली बसविले तर एक फलंदाज कमी होईल. टी-20 क्रिकेटमध्ये असा जुगार परवडणारा नसतो. बघूया हिंदुस्थानी संघाचे संयोजन काय असेल ते?
सामन्यावर पावसाचे सावट
विजयी सलामीमुळे यजमान ऑस्ट्रेलियन संघाचे मनोबल नक्कीच उंचावलेले असेल. जबरदस्त फिटनेस आणि टॉप गिअरमध्ये फलंदाजी करणाऱया कांगारूंना रोखण्याचे आव्हान हिंदुस्थानी गोलंदाजांपुढे असणार आहे. फिरकीपटू ऍडम झम्पाने आपली निवड सार्थ ठरवित ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या आठवडय़ात मेलबर्नमध्ये वाऱयाचा वेग अधिक आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीवरही पावसाचे सावट असेल.

Post a comment

 
Top