वाचक आणि दर्शक यांची सोयीनुसार विभागणी करण्यात माध्यमे धन्यता मानत आहेत. राजकारणी या साऱयाला अधिक पाठबळ देत माध्यमांना आपल्या तालावर नाचवत असून, त्यामुळेच वेगवेगळे इझम तयार झाले आहेत. एकूणच माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे मत ज्ये÷ पत्रकार शेखर गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल डिम्ड युनिव्हर्सिटी यांनी आयोजिलेल्या दुसऱया ‘दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्याना’चे वक्ते म्हणून गुप्ता बोलत होते. त्यांनी ‘आज सर्वाधिक धोका कशाला? प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याला की बातमीच्या सार्वजनिक विश्वासार्हतेला ?’ याविषयावर विचार व्यक्त केले. डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रा. अमिताव मलिक, डॉ. भामा वेंकटरमणी, प्रा. रुची जग्गी, डॉ. लतिका पाडगावकर आदी या वेळी उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले, आता माध्यमांमध्ये कबड्डीचा खेळ सुरू झाला आहे. यात जो तो एकमेकांना आपापल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी वाचकांच्या विश्वासार्हतेचा विचार करून आपले पाय खंबीरपणे रोवून उभे राहण्याचे धाडस माध्यमांना दाखवावे लागेल. आपल्यापेक्षा लोक अधिक हुशार आणि जागृत आहेत, याचे भान माध्यमांनी ठेवल्यास बरे होईल. सरकारने माध्यमांची गळचेपी करण्याइतकेच हेही संकट वेळीच ओळखून माध्यमांनी त्यावर काम केले पाहिजे. आपण स्वतःचीच टर उडविण्यात हातभार लावत असल्याने माध्यमांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत चालली आहे. लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट असल्याचेही गुप्ता यांनी या वेळी सांगितले.

Post a Comment