0
आजच्या स्पर्धेच्या युगात विविध उपक्रमामध्ये भाग घेवून स्वतःची ओळख निर्माण करून आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा. कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजाच्या हितासाठी एक सक्षम महिला म्हणून धाडसाने पुढे येवून महिलांनी कर्तबगारी दाखवावी. स्वच्छता ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपला परिसर व आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन इचलकरंजी पालिकेच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले. यावेळी वडगाव पालिकेच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले.
वडगाव नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने महिलांसाठी आयोजित गौरी- गणपती उत्सवानिमित्त झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.सुजित मिणचेकर फौंडेशनच्या संचालिका लेखा मिणचेकर, युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या व नगरसेविका प्रविता सालपे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, महिला बाल कल्याण समिती सभापती शबनम मोमीन, उपसभापती सावित्री घोटणे, सदस्या नम्रता ताईगडे,मैमुन कवठेकर, सुमती माळी, आरती थोरात, नगरसेवक संदीप पाटील, शरद पाटील,  मुख्याधिकारी अतुल पाटील व युवक क्रांती महाआघाडीच्या सर्व नगरसेविका उपस्थित होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन कुसुम पाटील व विमल पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी युवा क्रांती महाआघाडीच्या नेत्या व नगरसेविका प्रविता सालपे यांनी सांगितले की, वडगाव पालिकेने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले आहेत. पालिकेकडून राबविण्यात येणार्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सालपे यांनी केले.
लेखा मिणचेकर यांनी महिलांना एकजूट होऊन आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी पुढे यावे. स्वच्छता विषयी व आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सजग राहावे असे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी वडगाव शहरात थ्री स्टार मानांकनासाठी स्वच्छता सर्व्हेक्षण कार्यक्रमात वडगाव शहरातील सर्व महिला, पुरुष, विद्यार्थी, संस्था, बचत गट यांनी  सहभाग घ्यावा. घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत द्यावा असे आवाहन केले.
या झिम्मा फुगडी स्पर्धेत एकूण 11 संघांनी तर उखाणे स्पर्धेत 21 महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता ही सेवा या विषयावर भर देण्यात येवून जनजागृती करण्यात आली. यावेळी लेक वाचवा , पर्यावरण रक्षण, स्वच्छतेचे महत्व, मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम अशा विविध विषयावर झिम्मा फुगडीच्या गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
झिम्मा फुगडी स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील पंडेवाडीच्या धनलक्ष्मी महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक महालक्ष्मी ग्रुप पेठ वडगाव यांनी मिळविला. तिसरा क्रमांक तुळसी ग्रुप इचलकरंजी यांना मिळाला.
उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती नायकवडी अंबपवाडी,  दुसरा क्रमांक सुरेखा दाडमोडे इचलकरंजी, तिसरा क्रमांक सुनिता चव्हाण, उत्तेजनार्थ दिपाली खाडे यांना मिळाला. विशेष क्रमांक रंजना दिवटणकर, सुमन काशीद यांना देण्यात आला.यावेळी लकी ड्रो काढण्यात येवून संगिता माने यान पैठणीच्या मानकरी ठरल्या.
या झिम्मा फुगडी स्पर्धेचे परीक्षण वर्षा शेवडे, प्रिया चिबडे, यांनी तर उखाणे स्पर्धेचे परीक्षण पल्लवी कोळेकर, कस्तुरी घेवारी यांनी केले. प्रास्ताविक शिल्पा बेलेकर यांनी तर नियोजन पालिकेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी सविता ठोंबरे यांनी केले.
या कार्यक्रमावेळी वडगाव पालिकेने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने खास महिलांकरिता सुरु केलेल्या जिजाऊ महिला व्यायाम शाळेचे उद्घाटन इचलकरंजी पालिकेच्या नगराध्यक्षा अलका स्वामी व डॉ.सुजित मिणचेकर फौंडेशनच्या अध्यक्षा लेखा मिणचेकर यांचे हस्ते करण्यात आले.

Post a Comment

 
Top