0
कोलंबो - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी संसद १६ नोव्हेंबरपर्यंत निलंबित करण्याचा आपला आदेश मागे घेतला आहे. त्यांनी सध्याच्या राजकीय संकटातून तोडगा काढण्यासाठी सोमवारी विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे सभापती व यूएनपी नेते कारू जयसूर्या यांच्याशी सिरिसेना यांची बुधवारची बैठक व अमेरिकेसह अन्य देशांच्या वाढत्या दबावानंतर सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. अॅटर्नी जनरलांनीही राष्ट्राध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य ठरवला होता. संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनीही सिरिसेना यांच्याशी बुधवारी कोलंबोत चर्चा केली.

राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने महिंदा राजपक्षे यांच्या नावाची अधिसूचना प्रकाशित केली असल्यामुळे त्यांनाच पंतप्रधान मानले जाईल, असे जयसूर्या यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, विक्रमसिंघे यांनी आपण अद्याप पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे.
त्याआधी जयसूर्या यांनी सिरिसेना यांना पत्र लिहून संसद अधिवेशन स्थगित करणे व पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा त्यांचा निर्णय घटनाबाह्य व बेकायदेशीर ठरवला होता. संसद अधिवेशन न बोलावल्यास देशात हिंसाचार व अशांतता पसरण्याचा धोका निर्माण होईल, अशी भीती सभापतींनी व्यक्त केली होती. सिरिसेना यांनी शुक्रवारी अचानक घेतलेल्या निर्णयात विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते. माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.
बहुमतासाठी ११३ संख्याबळ आवश्यक 
श्रीलंकेतील २२५ संसद सदस्यांमध्ये बहुमतासाठी ११३ संख्याबळ आवश्यक असते. महिंदा राजपक्षे यांनी यूएनपीतून आलेल्या पाच सदस्यांसह १०१ सदस्यांचा पाठिंबा मिळवला आहे. राजकीय संघर्ष सुरू होण्याआधी यूएनपी नेते रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे १०६ व महिंदा राजपक्षे यांच्याकडे ९५ सदस्य आहेत. तामिळ राष्ट्रीय आघाडीचे १६ व पीपल्स लिबरेशन फ्रंटकडे सहा जागा आहेत.
लोकशाहीचा विजय होईल : रानिल विक्रमसिंघे 
संसद निलंबनाचा आदेश मागे घेतल्यानंतर १०६ खासदारांचा पाठिंबा असणारे पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी लोकशाहीचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. विक्रमसिंघे म्हणाले, लोकांचा आवाज ऐकण्यात आला. ५ नोव्हेंबरला अधिवेशन बोलावले आहे. यात लोकशाहीचा विजय होईल. मी अद्यापही पंतप्रधान आहे. सभागृहात माझे बहुमत आहे, याची मला खात्री आहे. दरम्यान, राजपक्षे यांना विक्रमसिंघेंच्या पाच खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

राजकीय संकट 5 नाेव्हेंबरला अधिवेशन, जगभराच्या वाढत्या दबावानंतर निर्णय

  • Sri Lankan President Maithripala Sirisena, suspension of parliament cancle

Post a Comment

 
Top