काकती महसूल सर्कलमधील मासेनट्टी येथील संभाजी रामचंद्र निलकंठाचे यांच्या ऊस मळय़ाला शॉर्टसर्किट होऊन गुरुवारी दुपारी आग लागून एक एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. दीपावली सणातील सर्वात महत्त्वाच्या बलिप्रतिपदे दिवशी ‘इडा पिडा टळो’ आणि बळीचे राज्य येवो’ अशी मागणी करणाऱया बळीराजाचा वारसा असलेल्या शेतकऱयावरचं संकट कोसळले आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
काकती येथून चार कि.मी. वर असलेल्या मासेनट्टी शिवारात संभाजी निलकंठाचे यांचा दहा एकरात ऊस मळा असून या सर्व्हे नं. 375 क्षेत्रातील ऊस मळय़ाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक डीपीला जोडलेल्या वीज तारातून ठिणग्या पडल्याने दुपारी 12 च्या सुमारास उसाने पेट घेतला. यामुळे एक एकरातील ऊस जळाला आहे.
ऊस मळय़ातील आगीने पेट घेतलेली दिसताच मालकासह सिद्धाप्पा मोळराखी, बाबू टुमरी, गोपीचंद नरेगवी, सचिन गवी व इतरांनी धाव घेऊन आग विझविली. एक एकर ऊस पिकविण्यासाठी जवळपास 50 हजार रुपये खर्च येतो. केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे. सकाळीच ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी सुरेख रांगोळी ऊस मळय़ातील घरासमोर संभाजी निळाकंठाचे यांच्या पत्नीने काढली होती. आपल्या उसाला योग्य भाव मिळावा, अशी मनोगत प्रार्थना केली होती. मात्र दुपारी डोळय़ादेखत ऊस जळून गेल्याने सारे कुटुंब अडचणीत आले आहे. हेस्कॉम व महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment