शेती म्हटलं की ग्रामीण भाग, ग्रामीण जीवन डोळय़ासमोर उभं राहतं. ती शेती कसण्यासाठी लागणारे मजूर, औजारे, शेतउपयोगी वाहने याचबरोबर जनावरांचही चित्र नजरेसमोर येतच. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनही केले जातेच. एवढ करुनही उत्पन्न किती होईल याची शाश्वती नसते. शहरात राहून सुद्धा घर बसल्या इमारतीच्या टेरेसवर भाजीपाला फुलवण्याची किमया केली ती कोल्हापुरातील रायगड कॉलनी, पाचगाव परिसरात राहणाऱया ईश्वरा चिले यांनी.
ईश्वरा चिले हे गव्हमेंट ऑडिटर होते. वेंगरुळपैकी गडदूवाडी (ता. भुदरगड) हे त्यांचे मूळ गाव. वडिलोपार्जीत शेती असल्याने त्यांना लहानपणापासून शेतीची आवड, पण नोकरीमुळे ते शक्य नव्हते. मात्र निवृत्तीनंतर त्यांच्या या आवडीने उचल खाल्ली आणि त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवर शेती करण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीनंतर त्यांनी टेरेस शेतीसाठी 800 स्केअर फूट टेरेसवर सेंद्रिय खत मिश्रित माती घातलेल्या सुमारे 50 कुंडय़ांचा वापर केला आहे.
त्यामध्ये सेंद्रिय खत, माती असे मिश्रण करुन दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला या कुंडय़ांमध्ये भाजीपाल्याची लागवड केली जाते. सलग आठ वर्षे ते बारमाही भाजीपाला पिकवतात. त्यामध्ये दोडका, घेवडा, काकडी यासारख्या वेलांची झाडे टेरेसच्या सभोवती लावली आहेत. त्यासाठी बांबूचा मंडप, त्याच्या खाली सेंद्रिय खतयुक्त माती टाकून कोंथंबिर, वांगी, भेंडी, गवारी, पोकळा, अशा अनेक भाज्यांचे ते उत्पादन घेत आहेत.
उन्हाळय़ामध्ये पाणीटंचाई होवू नये म्हणून ते दिवसभरातील घरातील सांडपाणी एका टाकीमध्ये साठवून पाणी टेसेस शेतीसाठी त्याचा वापर करतात. त्यामुळे उन्हाळयातही सांडपाण्यावर ही भाजी पिकविली जाते. भाजीवर रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून औषधे फवारणी वेळच्या वेळी केली जाते. यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवितात. त्यातून दरमहा सरासरी तीन ते साडेतीन हजारांचे उत्पन्न मिळत आहे. घरच्या घरी भाजीपाल्याचे उत्पादन झाल्यामुळे पैशासोबत वेळेची बचत होते. त्याचबरोबर आपली शेतीतील आवडही जपली जाते व ताजा भाजीपाला आपल्याला मिळतो.

Post a Comment