0
रत्नागिरीच्या मुख्य टपाल कार्यालयात लवकरच टपाल बँक सुरू होणार असून प्रत्येक तालुक्यातील टपाल कार्यालयात या बँकेचा विस्तार कक्ष उघडण्याच्या हालचाली सध्या वेगाने सुरू आहेत. या नियोजनामुळे गावागावात टपाल बँकेचे जाळे पसरण्याची चाहूल लागली आहे.
सध्या राज्यातील ग्रामीण भागात टपाल कार्यालयांचे जाळे आहे. येथे टपाल खात्याकडून बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव यांसह राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यांसारख्या विविध आर्थिक गुंतवणूक योजनांचा पर्याय दिला जातो. मात्र या निधीचा विनियोग व वापर करण्याचे निकष बँकेपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे कर्ज योजनांबाबत टपाल विभागात उदासीनता असते. त्यांचे व्याजदरदेखील बँकेच्या तुलनेत वेगळे असतात. साहजिकच टपाल कार्यालयात आर्थिक व्यवहार होत असले तरी त्याकडे आतापर्यंत ग्राहकांनी बँकेप्रमाणे कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे गावातील गरीब, छोटय़ा गुंतवणूकदारांनी टपाल विभागाच्या योजनांना पसंती दिली असली तरी नोकरदार आणि मध्यमवर्गियांसह उच्चश्रेणीतील गुंतवणूकदार टपाल कार्यालयापेक्षा बँकांमध्येच जाणे पसंत करतात. हीच उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने आता टपाल बँकेची पायाभरणी करण्यात आली आहे.
राज्यभर हे नियोजन वेगाने सुरू असून सर्वप्रथम जिह्याच्या मुख्य कार्यालयात या बँका उघडल्या जाणार आहेत. त्या दिशेने रत्नागिरीच्या टपाल कार्यालयात वेगाने हालचाली सुरू आहेत. या बँकेसाठी वेगळे संगणक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या कार्यालयातील कर्मचाऱयांनाच या नव्या आस्थापनेत सामावून घेतले जाणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक असे नामकरण झालेली ही बँक येत्या तीन महिन्यांत कार्यान्वित होण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे या बँकेत अंगठय़ाच्या ठशांवर आधारीत तंत्रज्ञानावर ग्राहक सेवा देण्यात येणार असल्याने ही सेवा जास्तीत जास्त सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.
कुरिअर कंपन्या आणि मोबाईलच्या अतिक्रमणामुळे आता टपाल कार्यालयांचे कामकाजाबरोबरच उत्पन्नही कमी होत चालले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी टपाल विभागाने यापूर्वी कार्यालयांमध्ये छोटय़ा शीतपेटय़ा आणि इतर वस्तूंची विक्री यांसारख्या अनेक योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते धोरण उत्पन्नवाढीसाठी यशस्वी ठरले नाही. आता जास्तीत जास्त सेवा देण्याचा चंग बांधला आहे. यामध्ये यावर्षीपासून सर्व तालुका टपाल कार्यालयात आधारकार्ड नोंदणी आणि दुरूस्तीची सेवा सुरू करण्यात आली आहे. यापुढच्या टप्प्यात टपाल बँका उघडण्याचा त्यांचा मानस आहे. जिल्हा मुख्यालयात ही बँक सुरू होणार असून तालुका कार्यालयात त्याचा विस्तार कक्ष ठेवण्याचे प्रायोगिक तत्वावर ठरवण्यात आल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. भविष्यात ही सोय इंटरनेटची सुविधा असलेल्या गावांत सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment

 
Top