पुणे - “महाराष्ट्रात अनेक गड बालेकिल्ले जिंकता येतील. मात्र, कोणत्याही राजकीय योद्ध्याला आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकता येणे शक्य नसते. देवेंद्र फडणवीस यांनी हा बालेकिल्ला जिंकला आहे. आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारा पहिला मुख्यमंत्री अशी फडणवीसांची नोंद करावी लागेल,’ असे प्रशस्तिपत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी दिले. फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल महायुतीचा घटक पक्ष या नात्याने सरकारला शुभेच्छा देताना त्यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
“मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम काम केले ते म्हणजे चैत्यभूमी शेजारी असलेल्या इंदू मिलची संपूर्ण जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरित करून घेतली. स्मारकासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या असून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे,’ असे आठवले म्हणाले. लंडनमधील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे खरेदी करून तेथे बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करून त्यातील ४० कोटींचा पहिला हप्ताही देण्यात आल्याबद्दल आठवले यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे. महाडच्या चवदार तळे येथील सुशोभीकरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचा विकास व त्यांना तीर्थस्थळ दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे आठवले म्हणाले.फडणवीस पुढील दहा वर्षे मुख्यमंत्री
“मुख्यमंत्री म्हणून सर्व समाज घटकांच्या हिताचे निर्णय घेऊन राज्याला देशातील सर्व क्षेत्रात सर्वोत्तम राज्य करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री शेवटच्या तळातील गरिबाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी, दिवसरात्र कार्य करत आहेत. पुढील दहा वर्षे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातून महाराष्ट्राची अखंड सेवा घडत राहो,’ अशा शुभेच्छा आठवले यांनी दिल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment