लग्नानंतर वयाच्या 60 वर्षापर्यंत संसार करीत असताना दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या पतीकडून होणारी शिवीगाळ, त्यातून होणारी मारहाण याला कंटाळलेल्या पत्नीने दारुडय़ा पतीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. सोलापूर विजापूर रोडवर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर गावात पतीने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱया पत्नीचा प्रताप उघडकीस आला. दरम्यान शुक्रवारी न्यायाधीश डी.सी. मोरे यांनी कुसूम यांना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सोमलिंग दोडप्पा डोगे (65, रा.हत्तुर, ता.द. सोलापूर) असे गळा आवळून खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कुसूम सोमलिंग डोगे (58, रा. हत्तुर, ता.द. सोलापूर) असे पतीचा गळा आवळणाऱया पत्नीचे नाव आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुना गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमलिंग यांना दारुचे व्यसन होते. त्यामुळे प्रत्येकवेळी दारु प्राशन करुन आल्यानंतर सोमलिंग आणि कुसूम यांच्यात वाद आणि भांडणे होत होती. प्रपंच करीत असताना होणारी हालापेष्टा सहन करीत कुसूम राहत होत्या. परंतु संसाराचा गाडा ओढताना कोणतेच सुख नाही, त्यात नवऱयाचे चार शब्द समाधानाचे नाहीत. मात्र नवऱयाकडून होणारा त्रास मात्र कायम. अनेक वर्षाच्या संसारानंतर कुसूम आणि सोमलिंग यांच्यात किरकोळ कारणावरुन नेहमी वाद होत होते. वाद फक्त शाब्दिक नव्हता. तर प्रत्येकवेळी पती सोमलिंगकडून होणारी मारझोड यामुळे कुसूम त्रासल्या होत्या.
दरम्यान, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोमलिंग नेहमीप्रमाणे दारु प्राशन करुन घरी आले होते. त्यांनी पत्नी कुसूम यांना दारुच्या नशेत लाथाबुक्यांनी मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यातून कशी-बशी सुटका करुन कुसूम घरातून बाहेर पडल्या. त्याचवेळी सोमलिंग यांनी घराचे दार लावून घेतले. दरम्यान गावातील टॉवरजवळ कोणीतरी भेटेल म्हणून कुसूम थांबल्या होत्या. तितक्यात सामू कुंभार नावाच्या व्यक्तीने कुसूम यांना सोमलिंग यांनी गळफास घेतल्याचे सांगितले. त्यानंतर कुसूम ओरडतच घराकडे धावल्या. कुसूम यांचा आवाज ऐकून परिसरातील लोकही त्यांच्या मागे धावले. त्यावेळी सोमलिंग यांनी घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतल्याचे कुसूम यांनी पाहिले. त्यानंतर पुतणी सुनिता, पुतण्या बनसिध्द, परमेश्वर कुंभार व सामु कुंभार यांच्या मदतीने सोमलिंग यांना खाली उतरवल्याचा बनाव केला होता.
या घटनेनंतर विजापूर नाका पोलिसांनी बेशुध्द सोमलिंग यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी सोमलिंग हे रात्री 10 वाजण्यापूर्वीच मरण पावल्याचे घोषित केले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात सोमलिंग यांच्या गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा दिसून आल्या. यामुळे पोलिसांनी सोमलिंग यांचे वैद्यकीय अधिकाऱयाकडून शवविच्छेदन करुन घेऊन त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेतले. त्यानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलीस नाईक अंबादास चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कुसूम व इतर दोन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे करीत आहेत.
शवविच्छेदनानंतर खून झाल्याचे उघडकीस
डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात सोमलिंग हे गळा दाबून श्वास गुदमरुन मरण पावल्याचे नमूद केले होते. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर कुसूम यांनी केलेला बनाव समोर आला. कुसूम यांनी सोमलिंग यांचा गळा दाबून जीवे ठार मारले असावे असा संशय असून, त्यानंतर इतर अज्ञात आरोपींच्या मदतीने प्रेताच्या गळ्याला दोरी बांधून छताला लटकवून, सोमलिंग यांनी दारुच्या नशेत गळफास घेतला असल्याचा बनाव करुन पुरावा नष्ट केला आहे.
Post a Comment