0
नवी दिल्ली :
लवकरच साखर उत्पादनात भारत ब्राझीलला मागे टाकेल, अशी माहिती अमेरिकेच्या विदेश कृषी सेवा विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या वर्षात 5.2 टक्के वाढीने भारतात साखरेचे 35.9 दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, खराब हवामान आणि इथेनॉलनिर्मितीसाठी इतर पिकांचा आधार घेतला जात असल्याने ब्राझीलमधील साखरेचे उत्पादन 30.6 दशलक्ष टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अंदाजानुसार भारतातील साखरेचे उत्पादन ब्राझीलपेक्षा जास्त झाले, तर साखर उत्पादनाच्या बाबतीत तब्बल 16 वर्षांनंतर भारत ब्राझीलला मागे टाकणार आहे. पारंपरिकरीत्या ब्राझील हा जगातला सर्वात मोठा ऊस आणि साखर उत्पादक देश मानला जातो. एकीकडे भारतातील साखर उत्पादन पाच टक्क्यांपेक्षाही जास्त वाढण्याचा, तर दुसरीकडे ब्राझीलमधील साखर उत्पादन सुमारे 21 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज अमेरिकन विदेश कृषी सेवा विभागाने वर्तविला आहे. ब्राझीलमध्ये उत्पादित होणार्‍या बहुतांश उसाचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. भारतात मात्र इथेनॉल कमी आणि साखर जास्त उत्पादित केली जाते. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी सवलती देण्यात आल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या प्रकल्पांवर गांभीर्याने काम करणे सुरू केले आहे. 
साखरेचे साठे कमी करण्यासाठी गेल्या काही काळापासून भारत धडपडत आहे. व्यापारी तूट कमी करण्याचा एक भाग म्हणून चीनला पुढील वर्षापासून साखर निर्यात करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, इंडोनेशिया व इतर देशांनीही साखर खरेदी करावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. साखर आयात कर 45 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्यात आला, तर भारताकडून साखर खरेदी केली जाऊ शकते, असे संकेत इंडोनेशियाने अलीकडेच दिले आहेत.साखर उत्पादन 4.5 टक्क्यांनी घटणार
जागतिक बाजारपेठेचा विचार केला, तर येत्या वर्षात साखरेचे उत्पादन 4.5 टक्क्यांनी कमी होऊन 185.9 दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात 188.3 दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. ब्राझील, थायलंड आणि युरोपमधील काही देशांत उसाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने उत्पादनाचे लक्ष्य कमी केले आहे. साखर निर्यातीच्या बाबतीत ब्राझील आघाडीवर असून, त्याखालोखाल थायलंडचा क्रमांक लागतो. 

Post a Comment

 
Top