0
  • Concrete roads are now 'readymade', Gadkari brought the formulaनागपूर - सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रदूषणाची समस्या निर्माण होते. रस्ते तयार करताना कालावधीही अधिक लागतो. या समस्येवर उपाय म्हणून देशात सिमेंट काँक्रीटचे रेडिमेड रस्ते तयार करण्याचे नेदरलंड येथील तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.


    उपराजधानी नागपुरात सिमेंट काँक्रीटचे मोठाले ब्लॉक्स तयार करून ते थेट रस्ते म्हणून जोडण्याचा प्रयोग विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल़ॉजी (व्हीएनआयटी) येथे यशस्वी ठरला असून लवकरच नागपूरच्या रिंगरोडच्या ३०० मीटरचे कामही याच तंत्रज्ञानातून केले जाणार आहे. देशभरात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी सांगितले की, रस्त्यांची कामे प्रदीर्घकाळ चालतात. दिल्लीत प्रदूषणाचे हे देखील महत्त्वाचे कारण मानले जाते.
    त्यावर उपाय म्हणून सिमेंट रोड साठीचे मोठाले ब्लॉक्स कारखान्यात तयार होतील. तयार झालेले ब्लॉक्स थेट रस्त्यांच्या जागांवर एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे रस्त्यावर सिमेंटची कामे केल्याने होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसणार असून रस्त्यांची कामेही झटपट उरकण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होणार नाही. नेदरलँडमध्ये हे तंत्रज्ञान खूप यशस्वी ठरले आहे. त्यामुळे त्याचा वापर आपल्याकडेही करण्याचे प्रयत्न होणार असून त्यासाठी नेदरलँडचे वैज्ञानिक मदत करणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. नागपुरात आयोजित होणाऱ्या इंडियन रोड काँग्रेसमध्येही या तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर चर्चा होणार आहे. या तंत्रज्ञानाची सुरुवातीची किंमत सामान्य तंत्रज्ञानाच्या तुलनेत थोडी अधिक आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीट ब्लॉक्सची निर्मिती कारखान्यांमध्ये करता आल्यास किमत बऱ्यापैकी कमी होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

Post a Comment

 
Top