महाबळेश्वरला सहलीसाठी आलेली बीएमडब्लू कार पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने ती दगडाजवळच अडकून थांबल्याने जीवितहानी टळली. या अपघातानंतर सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. मात्र कारमधील सर्वजण सुखरूप असल्याचे दृष्टीस पडताच साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
कारचालक प्रशांत राजेंद्र सस्ते (मोशी-भोसरी, पुणे) हा आपल्या ताब्यातील बीएमडब्लू कारमधून मित्रांना घेऊन आंबेनळी घाटातून जात असताना दाभिळनजीक अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 50 फूट खोल दरीत कोसळली. मात्र याच ठिकाणी असलेल्या दगडामुळे कार तेथेच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचे वृत्त कळताच सर्व यंत्रणा तातडीने घटनास्थळी धावल्या. पोलीस यंत्रणा व स्थानिक तरूणांनी कारचालकास शर्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले.
अपघातामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे कारचालक बडबडत होता. त्यास महाड रूग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलादपूर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे या अपघाताबद्दल निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Post a Comment