0
हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी ठाणे रेल्वे स्थानक आज दणाणून गेले. ठाणे-पालघर जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी गुरुवारी विशेष एक्स्प्रेसने अयोध्येकडे कूच केले तेव्हा तमाम ठाणेकर प्रवाशांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. या यात्रेत सहभागी होण्यासाठी शिवसैनिकांची विशेष एक्प्रेस आज लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघाली. ठाणे स्थानकात ही एक्स्प्रेस येताच प्रचंड जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी यांसह पालघर जिह्यातील हजारो शिवसैनिक या विशेष एक्स्प्रेसने अयोध्येला रवाना झाले. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, सभागृहनेते नरेश म्हस्के, ठाणे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपशहरप्रमुख जगदीश थोरात, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, विलास ढमाले, उपविभागप्रमुख बाळा गवस यांनी विशेष एक्स्प्रेससमोर श्रीफळ वाढवून मोटरमनला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
शिवसैनिकाने मोटरसायकलवरून प्रवास करत गाठली अयोध्याशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाचे साक्षीदार होता यावे म्हणून हजारो शिवसैनिक स्वखर्चाने अयोध्येला गेले आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या प्रत्येक सभेला हजेरी लावणारे शिवसैनिक मोहन यादव यांनी मोटारसायकलीवरून दहा दिवस प्रवास करून अयोध्या गाठली आहे. मूळचे पुणे येथील असणारे यादव यांची मोटरसायकलही भगव्या रंगाची आहे. शिवसेनेच्या कार्यक्रमाला जाताना यादव हे याच मोटरसायकलवरून जातात. भगवे कपडे आणि भगवी टोपी ही त्यांची ओळखच बनली आहे.

Post a Comment

 
Top