0
    • While giving candidacy to the Lok Sabha, the candidate should not be oustedलातूर - अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये. स्थानिक व्यक्तीला संधी द्यावी यासाठी सर्वच पक्षांवर दबाव टाकण्यासाठी ऐन दिवाळीत लातूर लोकसभा विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जातीमधील काही विचारवंतांनी पुढाकार घेतला आहे.


      सर्वसाधारणपणे एखादा मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव झाला की तेथील मातब्बर नेते स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातला उमेदवार तेथून उभा करतात आणि त्याला निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावतात. स्थानिकचा उमेदवार निवडून आल्यास भविष्यात तो मोठा होईल आणि आपल्या शक्तिस्थळांना आव्हान देऊ नये अशी तजवीज केली जाते. उमेदवार बाहेरून आयात करायचा. त्याला निवडून आणायचे, पाच वर्षे त्याच्या माध्यमातून सत्ता राबवायची. तो सोयीचा असेल तर त्याला पुन्हा संधी द्यायची, जड होत असेल तर पुन्हा दुसरा उमेदवार आयात करायचा आणि त्याला निवडून आणायचे असेच राजकारण राखीव मतदारसंघात दिसून येते. लातूरही त्याला अपवाद राहिलेले नाही.

      लातूरमध्ये काय झाले होते : लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर उस्मानाबाद खुला होऊन लातूर लोकसभा मतदारसंघ २००९ साली अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव झाला. युतीच्या वाटणीत हा मतदारसंघ भाजपकडे होता. भाजपने त्यावेळी सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयवंत आवळे यांना लातूरमधून उभे केले. त्या वेळी काँग्रेसमध्ये किमान डझनभर स्थानिक नेते आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपण खासदार होऊ अशी अपेक्षा बाळगून होते. पण शेवटच्या क्षणी दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरसाठी जयवंत आवळे यांची निवड केली. आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यात लातूरशी कसलाच संपर्क नसलेले जयवंत आवळे केवळ विलासरावांच्या प्रभावामुळे अर्ज दाखल केल्याच्या सोळाव्या दिवशी खासदार म्हणून निवडून गेले. विलासरावांच्या या निर्णयाविरोधात त्यावेळी मोहन माने या काँग्रेस कार्यकर्त्याने आवाज उठवला.
      मात्र त्यांची ताकद कमी असल्यामुळे हा आवाज अत्यंत क्षीण ठरला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जयवंत आवळेंची पुन्हा निवडणूक लढवायची इच्छा होती. परंतु त्यांच्या विरोधात काँग्रेसमध्येच एक गट सक्रिय झाला होता. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नरेंद्र जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू करण्यात आली. त्याहीवेळी स्थानिक काँग्रेसच्या मंडळींनी बाहेरचा उमेदवार पुन्हा नको अशी मागणी सुरू केली. ती लक्षात घेऊन काँग्रेसने स्थानिक दत्तात्रय बनसोडे या ७० वर्षाच्या नेत्याला उमेदवारी दिली. ते निवडून आलेच तर त्यांच्या वयोमानामुळे त्यांचे आव्हान असणार नाही हा यामागचा विचार होता.
      पुन्हा एकदा स्थानिकांत अस्वस्थता 
      आता २०१९ च्या निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर भा. ई. नगराळे यांच्यासारखे माजी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह काही नेत्यांच्या लातूरला चकरा सुरू झाल्या आहेत. ही मंडळी लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा पेरल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक मंडळी जागी झाली असून त्यांच्या प्रेरणेने एका विचारमंचाची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही पक्षाने लातूर बाहेरचा उमेदवार लादू नये असा निर्णय या विचारमंचात घेण्यात आला असून यासाठी सर्वपक्षीय नेत्यांवर दबाव वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top