0
तीन दिवसांपासून राष्ट्र अभिमानी व जाधव कुटुंबीयांना लागलेली अंत्यदर्शनाची आस संपुष्टात येऊन गहिवरलेल्या सर्वांच्याच अश्रूचे बांध फुटले. गुरुवारी बुदिहाळ येथे दाखल झालेल्या हुतात्मा प्रकाश जाधव यांच्या पार्थिवाचे सर्वांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर सकाळी ठिक 11.46 वाजता वीर जवान प्रकाश जाधव अमर रहे… भारत माता की जय अशा घोषणा देत मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांनी मानवंदना देऊन फैरी झाडताच पारंपरिक पद्धतीने हुतात्मा प्रकाश जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला.
बुधवारी रात्री बेळगाव येथे दाखल झालेले हुतात्मा प्रकाश जाधव यांचे पार्थिव सकाळी 8.53 वाजता बुदिहाळ येथे बेळगावच्या मराठा लाईफ इन्फंट्रीच्या वाहनाने आणण्यात आले. यापूर्वी सकाळी 7 वाजल्यापासूनच बुदिहाळ येथे नागरिक, महिला, विद्यार्थी, युवक गर्दी करत होते. पार्थिव जाधव यांच्या घरासमोर आणताच पार्थिवाचे दर्शन पत्नी निकीता, आई शारदा, वडील पुंडलिक, भाऊ सचिन, भावजय श्रृतिका यांच्यासह अवघ्या तीन महिन्यांची नवजात कन्या श्रावणी हिने अंत्यदर्शन केले. यावेळी मान्यवरांसह ग्रामस्थ, महिलांच्या अश्रूंचे बांध फुटले. यामुळे हृदय पिळवटून टाकणारा एकच आक्रोश झाला.
घरासमोर अंत्यदर्शन व पूजाविधी होताच आकर्षक सजावट केलेल्या ट्रक्टर ट्रॉलीतून लष्करी इतमामात बुदिहाळ येथील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून अंत्ययात्रा मार्गावरून आकर्षक रांगोळ्य़ा रेखाटण्यात आल्या होत्या. महिलांनी औक्षण करून पार्थिवावर फुलांची बरसात केली. युवक, विद्यार्थ्यांनी अमर रहे, अमर रहे प्रकाश जाधव अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत देशभक्ती व्यक्त केली.
अंत्ययात्रा जाधव मळा येथे पोहोचताच पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी प्रथम पोलीस दलाने फैरी झाडून मानवंदना दिली. यानंतर जिल्हा अधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी, प्रांताधिकारी रवींद्र करळीन्नावर, जिल्हा सैनिक बोर्डाच्या संचालिका कमांडो इंदूप्रभा व्ही., मराठा लाईफ इन्फंट्रीचे बिग्रेडिअर गोविंद काळवट यांच्यासह माजी आमदार काका पाटील, प्रा. सुभाष जोशी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सहकारनेते आण्णासाहेब जोल्ले आदी मान्यवर, लष्कर अधिकारी यांनी वीर जवानाच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

 
Top