0
समाजात महिलांना  समस्या आहेत या गोष्टीची जाणीव स्त्री व  पुरूष दोघांनाही आहे. मात्र, त्या समस्यांबद्दल उघडपणे बोलण्याचे धाडस न करता समस्यांसोबतच जगणे माणूस शिकतो. महिलांच्या समस्या समाजात बोलल्या जाव्यात, हा संदेश ‘खरवस’ या चित्रपटातून देण्यात आला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.49 व्या इफ्फी त इंडियन पॅनोरमा नॉन फिचर चित्रपट विभागाची सुरूवात ‘खरवस’ ने झाली. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जांभळे बोलत होते. ‘खरवस’ व ‘ओलू’ या चित्रपटाची टीम उपस्थित होती. यात ओलू चे दिग्दर्शक शाजी करूण, शेन निगम, एस्तर अनिल, ए. व्ही. अनुप मधुकर जोशी उपस्थित होते.   


जांभळे म्हणाले, की ‘खरवस’ चे गोव्यात पाच दिवसांचे चित्रीकरण करण्यात आले. एका गरोदर महिलेने आपले बाळ गमावल्यानंतर ती महिला ज्याप्रकारे दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, त्या अवस्थेवर चित्रपट आधारित आहे. महिला आधी स्वत: बरोबर व त्यानंतर समाजाविरोधात घडलेल्या प्रकारानंतर कशाप्रकारे सामोरी जाते याची व्यथा चित्रपट सांगतो. वाईट घटना घडल्यानंतर माणसाला ती विसरून आयुष्यात पुढे जा, असे आपण लगेचच सांगू शकत नाही. माणसाला त्या भावनेतून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो व तो वेळ एखाद्याला देणे महत्वाचे आहे. तिच परिस्थिती चित्रपटातून दाखविण्याचा आपण प्रयत्न केला आहे.  

इफ्फीत चार वर्षांपूर्वी आपण प्रतिनिधी मधून सहभागी झालो होतो. आज चार वर्षांनंतर आपल्या ‘खरवस’ या चित्रपटाने इंडियन पॅनोरमा नॉन फिचर चित्रपट विभागाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे आनंद व उत्साह व्दिगुणीत होत असून इफ्फीतून खूप चांगले अनुभव मिळाले आहेत, असेही जांभळे यांनी सांगितले. शाजी करूण म्हणाले, की एखाद्या व्यक्तीला न पाहताच चित्राच्या सहाय्याने त्या व्यक्तीवर प्रेम करणे फार कठीण आहे. तेच प्रेम ‘ओलू’ मध्ये दाखविण्यात आले असून प्रेम या भावनेतील निर्मळ भाव चित्रपटात दिसून येतो. 

गाय-महिला समन्वयाचा प्रयत्न

‘खरवस’ चित्रपटात गरोदर गाय दाखविण्यात आली आहे. चित्रपटासाठी गाय निवडणे फार कठीण झाले होते. त्यासाठी गाईंच्या ऑडिशन्स ्घेण्यात आल्या असेही आपण म्हणेन. गाय खरीच गाभण असताना चित्रिकरण  करणे चुकीचे असल्याने गाभण दिसणारी व परिस्थितीशी अनुरूप अशी गाय शोधावी लागली. एक गाय गाभण कशी असेल यावर अभ्यास करावा लागला. चित्रपटात सदर गाय व महिलेचा समन्वय कसा साधता येईल त्यावर भर देण्यात आला आहे. 

Post a Comment

 
Top