- मुंबई- आरक्षणासाठी मराठा तरुणांनी शेवटपर्यंत लढा दिला आणि आरक्षण मिळवले हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आंदोलनादरम्यान काही मराठा आंदोलकांवर खोट्या केसेस टाकल्या गेल्या आहेत. काहींना बनावट गुन्ह्यांखाली अटक केली आहे त्यांची सुटका करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल आणि आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी सेवेत घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलकांना दिले. ठाकरे यांच्या आश्वासनानंतर ठोक मोर्चाने आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा ठोक मोर्चातर्फे आंदोलन सुरू होते. गुरुवारी विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ठाकरे यांनी सायंकाळी आझाद मैदान येथे जाऊन आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या वेळी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेवला आहे.
ज्या आंदोलकांना या आंदोलनादरम्यान प्राण गमवावे लागले त्या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. शिवसेना नेहमी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि आरक्षण कोर्टात टिकेल आणि ते टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असे सांगून आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment