0
पुणे - ‘मराठा आरक्षणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे तीच माझी आहे. काँग्रेस व शिवसेनेचीही तीच आहे. पण मी मांडल्यावरच लोकांना वावगे का वाटते कळत नाही. काही लोक माझ्याविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी खंत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात व्यक्त केली.


‘एसईबीसी (शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास) व ओबीसी हे एकच आहे. घटनेत ओबीसी हा शब्द नाही. सोयीसाठी आपण वापरतो. एससी, एसटी व अाेबीसींच्या मूळ अारक्षणाला धक्का न लावता वेगळा प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशीच माझीही भूमिका अाहे. शासनदेखील त्याच दिशेने पावले टाकत आहे,’ असेही भुजबळांनी सांगितले. समता परिषदेतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समता पुरस्काराने गौरवण्यात आले. पवार म्हणाले, मराठा आरक्षणाला भुजबळांचा विरोध असल्याचे काही मराठा संघटनांचे मत आहे.

काही मराठा संघटनांनी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते अशी ओळख असलेल्या भुजबळांना ‘लक्ष्य’ केले जात असल्याचे भुजबळ समर्थंकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘दलित-आदिवासींचे २० टक्के, व्हीजेएनटी आणि इतर प्रवर्गांचे १३ टक्के आणि ओबीसींचे १७ टक्के यांचे आरक्षण वेगळे ठेवा एवढीच इच्छा आहे,’ असे ते म्हणाले.

भुजबळांची टाेलेबाजी
पुण्यात फुले स्मारक व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला जोडण्याचा प्रस्ताव बरीच वर्षे प्रलंबित आहे. भुजबळ म्हणाले, ‘फुलेंचे स्मारक आणखी सुंदर, प्रशस्त व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण जमले नाही. आम्ही काय १० हजार कोटींचे, ५ हजार कोटींचे स्मारक मागत नाही. काही लाखांचाच प्रश्न आहे. तेवढे लवकर व्हावे ही इच्छा आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत 
मनुवाद संपवायचा तर जोतिबा-सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जावा लागेल. फुलेंचा विचार वाढवणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.


‘महात्मा फुले समता पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांनी पुरस्कार स्वीकारला. पवार म्हणाले, पुन्हा एकदा प्रतिगामी विचार प्रसृत करण्याचा प्रयत्न दिसत आहे. राजस्थान न्यायालयाच्या आवारात मनूचा पुतळा बसवण्यात आला. सत्तेवर असणाऱ्यांच्या डोक्यातून आजही मनुवाद गेलेला नाही. अशा वेळी विषमतेविरोधात लढण्याचे फुलेंनी दिलेल्या सूत्राचा अवलंब करावा लागणार आहे. जोतिबा, सावित्रीबाईंनी १५० वर्षांपूर्वी दाखवलेली आधुनिकता, विज्ञाननिष्ठता आश्चर्य वाटावी इतकी काळाच्या पुढची होती. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण फुलेंनी केले.

शेती, शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही, हे फुलेंनी सांगितले. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारतात आला असता फुल्यांनी त्यांच्याकडे शेतीला आधुनिकता देण्याची मागणी केली. आज आपण संकरित बियाण्यांची चर्चा करतो, पण फुलेंनी त्याकाळात परदेशातून संकरित बियाणे आणण्याची विनंती जॉर्जला केली. दुधाचा धंदा वाढवायचा तर गायींची पुढची पिढी समृद्ध असली पाहिजे. त्यासाठी विलायतेतून वळू आणून देशी गायींशी संकर करण्याची कल्पनाही त्यांनी त्या काळी मांडली होती, असे पवारांनी सांगितले.


महात्मा फुले मला माझे आजोबाच वाटतात : ‘महात्मा फुलेंचा फोटो पाहिला की आदर, आपुलकी वाटते. असे वाटते की, हे आपले आजोबाच आहेत. महिलांसाठी त्यांनी जे जीवतोड कार्य केले तसे त्यांच्यापूर्वी कोणीच केले नव्हते, असे प्रतिभा पाटील म्हणाल्या.SEBC-OBC is not the only, OBC word in the Constitution;

Post a Comment

 
Top