0

सरकार सूडबुद्धीने नाही तर नियमाने कारवाई करत आहे, असे उत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळय़ाप्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपांना दिले आहे. सिंचन घोटाळय़ाला अजित पवारच जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर खंडपीठात सादर केले आहे. मात्र या मुद्यावर सरकार राजकारण करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, आमचा कुठल्याही तपास यंत्रणेवर दबाव नाही. एसीबीने कारवाई केली असून ते चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आहेत. निवडणुका किंवा अधिवेशन डोळय़ासमोर ठेऊन कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. अजून अनेक प्रकरणे बाहेर यायची आहेत, अनेक नावे समोर येणार आहेत. जे दोषी आढळले आहेत, त्या सर्वांना शिक्षा होणार, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
तसेच सिंचन घोटाळय़ाप्रकरणी कारवाई का होत नाही, असा प्रश्न विरोधक गेल्या चार वर्षांपासून विचारत आहेत. इतकी वर्ष फक्त चौकशीच का सुरु आहे, असे जयंत पाटील विचारत होते. याचा अर्थ अजित पवारांना चौकशीशिवाय जेलमध्ये टाकावे अशी त्यांची इच्छा आहे का? असेही गिरीश महाजन म्हणाले.

Post a Comment

 
Top