0
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त विविध साहित्यांच्या खरेदीसाठी गेले आठवडाभर सांगलीकरांचा आनंद व उत्साह ओसांडून वाहत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला व्यापाऱयांसह अनेक नागरिकांनी वही खरेदीचा मुहूर्त साधला. यंदा लक्ष्मीपूजन बुधवारी आल्याने,  दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपुजनासाठी लागणारी फुले, फळे, पूजेचे साहित्य, आदींची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात अक्षरशः झुंबड उडाली होती.
  दिपावलीसाठी लागणाऱया विविध वस्तुंनी बाजारपेठ सजली आहे. यामध्य़े झेंडूची फुले, प्लास्टीकचे हार, फुलांचे हार, विविध प्रकारची फळे, अगरबत्ती, प्रसादाची पाकिटे, लक्ष्मीदेवीचे फोटो, तयार पुजेचे साहित्य, चिरमुरे, भेंडबत्ताश्य़ांची पाकिटे, कोहळा, आंब्यांची डहाळे, ऊस, नारळ, नारळाच्या झावळय़ा, आदी अनेक प्रकारचे साहित्य विकण्यासाठी बाजारात छोटय़ामोठय़ा विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केल्याने बाजारपेठेत यात्रेचे स्वरुप आले होते. या सणानिमित्त लागणाऱया वस्तूंची विक्री करण्यासाठी स्थानिकांसह परराज्यातीलही व्यापाऱयांनी आपली हजेरी लावली आहे. दिवाळी या सणातील लक्ष्मीपुजन हाच मुख्य दिवस असल्याने, यासाठी लागणाऱया झेंडुंच्या फुलांचे ढिग, बाजारात दिसून येत आहेत. मागील वर्षी 100 रुपयांपुढे असणारा झेंडू यंदा मात्र दर घसरल्याने 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत विकला जात आहे.
त्याचबरोबर पुजेमध्ये वेगवेगळया प्रकारची पाच फळे लागत असल्याने, अनेक प्रकारची फळे विकणारे विपेते बाजारात आले आहेत. त्यांचेही ढिग बाजारात दिसून येत होते. यामध्ये संत्री, मोसंबी,चीकू, सफरचंद, डाळींब, सिताफळ, केळी, कवठ, आदी प्रकारची फळे आहेत. या पाच फळांचा दर 20 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत आहेत. तसेच घरे, दुकान, शोरुम, आदींच्या दरवाजाला लावण्यात येणाऱया केळीचे कूट, ऊस, नारळाच्या झावळयांच्या ढिगांनीही शिवाजी पुतळा परिसर, वखारभाग परिसर, आदी ठिकाणी गर्दी केली होती. उसांची एक जोडी 20 ते 40 रुपये, तर झावळयांचे दर 30 ते 50 रुपयांपर्यंत आहेत. यांच्यासह आंब्याची डहाळेही व आमावस्येनिमित्त लागणारे कोहाळयांचेही ढिग जागोजागी दिसून येत होते. यातील लहान कोहळय़ाचा दर 50 रुपयांपुढे तर मोठय़ा कोहळय़ांचे दर 100 रुपयांपर्यत आहेत.
 लक्ष्मीमाता, कुबेर, श्री यंत्र आदी देवीदेवतांच्या प्रतिमेचे फोटोही बाजारात विक्रीस आलेले आहेत. यांचे दर 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यत आहेत. त्याचबरोबर फोटोला लागणारे प्लास्टीकचे कृत्रिम हारही विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचे दर 20 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत आकारमानानुसार कमी जास्त आहेत. या शिवाय पुजेचे सर्व तयार साहित्य, प्रसादाचे साहित्य, चिरमुरे, भेंडबत्तासे, उदबत्ती, सुवासिक धूप, केरसूणी, आदी सर्व साहित्यांची बाजारात रेलचेल आहे. घराला लावायची कृत्रिम फुलांची तोरणे, माळा, हार, आंबाच्या पानांची प्लास्टीक तोरणे, काळय़ा बाहुल्या, नजर लागू नये म्हणून वापरण्यात येणारे नजरबंदीचे राक्षसी मुखवटे आदी विविध साहित्य विकणारे कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील विक्रेत्यांनीही बाजारात ठाण मांडले आहे. कृत्रिम रंगीबेरंगी फुलांची झाडे, शोभेच्या कुंडय़ा, विविध सजावटीच्या शोभेच्या वस्तू, आदी सर्व साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने, बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली होती.
 या निमित्ताने फटाक्यांचीही विक्रीही सुरु होती. तरुण भारत स्टेडीयम, कल्पदुम क्रीडांगण, आदी ठिकाणी असलेल्या फटाके स्टॉलवर दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरु होती. मारुती चौक, शिवाजी पुतळा परिसर, आनंद टॉकीज परिसर, बालाजी चौक, कापडपेठ, मेनरोड, भारती विद्यापीठ परिसर आदी भागांत विक्रेत्यांनी ठाण मांडल्यांने वाहतुकीस काही काळ अडचण निर्माण होत होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. विविध मार्गावर रस्ते काही काळ ठप्प झाले होते.
पावसाने विक्रेत्यांची पळापळ
सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने विक्रेत्यांची व ग्राहकांची दैना उडाली. त्यामुळे बाजार थोडा अस्ताव्यस्त झाला. पण, पाऊस थांबल्यानंतर पुन्हा बाजारपेठ पहिल्यासारखी गजबजून गेली. सायंकाळी 6 ते रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी सांगलीकरांची अक्षरशः झुंबड उडाली होती. रांगोळीमध्ये पाणी गेल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झेंडूही भिजला होता.
 

Post a Comment

 
Top