0
घरोघरी तसेच व्यापारी दुकानांमध्ये मंगलमय वातावरणात लक्ष्मीची मुहूर्तानुसार पूजा, व्यापारी वर्गाकडून वहय़ांचे पूजन व नवीन वस्तूंची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा आस्वाद अशा अल्हाददायी वातावरणात बुधवारी सायंकाळी निपाणी, चिकोडी, संकेश्वर, रायबागसह परिसरात लक्ष्मी व कुबेर पूजन करण्यात आले.
बाजारपेठेत पूजेच्या व सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. दिवसभरात विविध वस्तूंच्या खरेदीतून कोटय़वधीची उलाढाल झाल्याचे दिसून आले. महिला, युवतींनी आपल्या घराच्या अंगणात आकर्षक रांगोळय़ा घातल्या होत्या. सायंकाळी विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून गेला होता.
सकाळपासूनच केळीची झाडे, झेंडूची फुले, रोपे, ऊस, केळी, फळे, फुले, पूजेचा पुडा, नारळ, कापूर, उदबत्ती, आकाशकंदील, पणत्या आदी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडाली होती. सायंकाळी 7.36 ते रात्री 9.32 असा मुहूर्त लक्ष्मीपूजनासाठी होता. बहुतांशी ठिकाणी याच मुहूर्तावर घरोघरी तसेच दुकानांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले. सायंकाळी 7 नंतर मध्यरात्रीपर्यंत विधीवत तसेच भक्तीमय वातावरणात लक्ष्मीपूजन करण्यात आले.
 ग्रामीण भागातून शहरात उत्पादकांनी ट्रक, ट्रक्टर यामधून केळीची झाडे आणली होती. लक्ष्मी देवता ही पैशाच्या रुपात आपल्यात वास करते, अशी धारणा असल्याने लक्ष्मी पूजनासाठी नव्या नोटांची पूजा तसेच हार देवीला अर्पण करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही फुलांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानुसार पिवळा झेंडू 80 ते 100 तर केशरी झेंडू 50 ते 80 रुपये किलोने विकण्यात आल्याचे दिसून आले.
फटाके विक्रीत घट
गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी या सणामध्ये आकर्षक सजावटी व विद्युत रोषणाईबरोबर फटाक्यांची आतषबाजी ही ठरलेलीच असते. त्यामुळे फटाके विक्रीतून निपाणीत सणासुदीच्या काळात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 25 ते 30 टक्क्यामध्ये फटाके विक्रीत घट झाल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने 125 डेसीबलपर्यंतच्या आवाजाच्या फटाक्यांना परवानगी दिली आहे. तसेच फटाके वाजविण्यासाठी वेळेचेही बंधन घातले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम फटाके विक्रीवर झाल्याचे दिसून आले.

Post a Comment

 
Top