0
दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल करण्यात येत आहे. परंतु खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने फटका बसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील अधिकतर एटीएममध्ये ठणठणाट असल्याने नागरिकांना पैशांसाठी वणवण करावी लागत होती.
ऐन दिवाळीत बँकांना असलेल्या सुटय़ा आणि एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे पैसे नेमके कोठून मिळवावेत, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. शहरातील किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, काकतीवेस रोड या मुख्य बाजारपेठेच्या परिसरात एटीएम बाहेर नो कॅशचे बोर्ड झळकत होते. यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा कोणत्या एटीएममध्ये पैसे आहेत, हे पाहण्यातच वेळ जात होता.
दिवाळीत होणारी खरेदी लक्षात घेऊन संबंधित बँकांनी एटीएममध्ये पैसे भरणे गरजेचे होते. पैसे भरण्याची जबाबदारी ही एजन्सीकडे असल्याने त्यांनी ती जबाबदारी पार पाडणे गरजेचे होते. परंतु ते तसे न झाल्याने पैसे असूनही नागरिकांना मात्र वणवण करावी लागत होती. ज्या एटीएममध्ये पैसे होते अशा एटीएम बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

Post a Comment

 
Top