0
अनेक संवर्धन संस्थांतर्फे गडदुर्गांचे संवर्धन कार्य चालू आहे. अनेक इतिहास प्रेमी गडकोटांना भेट देतात, तेथील वास्तूंची रचना, त्यांचा वापर, त्यांचा इतिहास जाणून घेतात. पण अनेक हुल्लडबाज लोक तेथे जाऊन तेथील वास्तूंची विटंबना करतात. सामान्य लोकांमध्ये गडकोटांविषयी आदर प्रेम निर्माण करणे जरुरीचे आहे. तेथील वास्तू जपणे संवर्धन करणे गरजेचे आहे. तरच येणारी पिढी हे गडकोट पाहू शकतील, तेथील इतिहास जाणून घेऊ शकतील. जगातील एका महान राजाच्या राज्याची राजधानीचा मान मिळवणारा गडांचा राजा दुर्गदुर्गेश्वर श्री रायगड साकारणे म्हणजे एक आव्हानात्मक काम आहे.
लक्ष्मी रोड, शहापूर येथील श्री महागणपती युवक मंडळातर्फे यावषी शिवकालीन रायगडाची हुबेहुब प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ल्यावर काही शिवकालीन देखावे दाखविले आहेत. त्यावेळी हा किल्ला कसा होता व त्यावेळा तेथील वास्तुंची नावे काय होती. व आता काय आहेत. तेथील वास्तुंचा त्याकाळात कोणत्या कारणांसाठी वापर केला जात होता. पण आता त्याबद्दल काय म्हटले जाते. या किल्ल्याची पुरेपूर माहिती संदर्भासह मिळत असल्याने दुर्गप्रेमींकडून या युवकांचे कौतुक केले जात आहे. सदर किल्ला बनविण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागला असून 3 युवकांनी तो बनविण्यासाठी आपले योगदान दिले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे व नोकरी व्यवसाय करणारे मेघन तारिहाळकर, माणिक पाटील, वैभव चंदरकर, किरण गावडे हे युवक दिवसभर वेळ मिळत नसल्याने रोज रात्रीच्यावेळी 10 नंतर हा किल्ला बनवीत असत. जवळपास 30 ते 35 फुट लांब व 5 ते 5.30 फुट उंच असून त्यातील सर्व वास्तु त्या त्या ठिकाणी हुबेहुब साकारल्या आहेत.
 असा हा किल्ला आहे की रोज त्यावर नवीन संशोधन होते. रायरी या नावाने ओळखल्या जाणाऱया एका डोंगराला महाराजांनी हेरून त्यावर राजधानी बसविली. हिरोजी इंदुलकर(इटळकर) या अभियंत्याने 14 वर्ष गडाचे बांधकाम केले. मंदिरे, राजवाडे, कूप, विहीरी, तलाव, नागरपेठ, भांडरगृहे, गजशाळा, रत्नशाळा मनोरे सदर राजधानीला शोभेल अशा 350 वास्तू या रायगडावर बांधलेल्या आहेत. या किल्ल्यास 10 व्या शतकापासून अनेक नावे आहेत. रायरी, तणस, रासिवटा, नंदादीप, जंबुद्वीप, राहिर, राजगिरा, रायगिरी, बदेनूर, शिवलंका, रेड्डी, रायगड, इस्लामगड, उत्तमगड व इंग्रजांनी याची दुर्गमता व अभेद्यता पाहून यास जिब्राल्टरची उपमा दिली.

Post a Comment

 
Top