0
सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. उंचच उंच डोंगर कडा आणि त्याखाली खडकांनी भरलेली लालसर ओबडधोबड नेहमीच तहानलेला परिसर. अशा तहानलेल्या डोंगराळ खडकाला पाणी पाजणाऱया एका शेतकऱयाची ही प्ररेणादायी कहाणी अनेकांना प्रेरणा देते.
कोरेगाव तालुक्याचा उत्तरेचा भाग म्हणजे सह्याद्रिच्या सावलीचा प्रदेश. त्यामुळे पर्जन्यमान अतिशय कमी. याच भागात जाधववाडी गाव आहे. या गावचा शिवार म्हणजे चक्क खडकांचा, डोंगर माथ्याचा, म्हणजे कुसळ उगवतानाही खूप त्रास होतो. शेकडो एकर रान अशाच कुसळ अन् गवताच. आमची गाडी वाठार स्टेशनवरुन वळून उत्तरेला निघाली होती.दहा किलोमीटर डांबरी रस्त्यावरुन जावून डोंगर रस्त्याच्या कच्च्या मार्गाला गाडी निघाली. समोर जणू डोंगर रस्त्यासाठीच मोटार सायकल बनवलेली असावी, असे मोटरसायकल स्वार जात होते.
आम्हाला गंतव्यस्थान कुठे हे कळत नव्हते.माणसालाही चालता येणार नाही, असा डोंगर रस्ता. आजूबाजूला प्रचंड झाडाझुडपाची गर्दी, आपण जंगलात चालोय असा भास होणारा रस्ता. एक किलोमीटर, दोन किलोमीटर रस्ता काही सरायचा मार्गच नाही. समोर डोंगर दिसतोय. तीन साडे तीन किलोमीटर मोठय़ा मुस्किलीने आलो. तितक्यात वाळवंटात ओयायसिस चमकावे तसे पाणी आणि शेती दिसली आणि तिथे जावून गाडी थांबली.शेतकरी पुढे आले.
माझ नाव रामचंद्र जाधव. सहा वर्षांपूर्वी हे बाप दादाच डोंगराळ रान शेत करायच हे मनी ठरवल. एक मुलगा मिलिटरीत तर दुसरा माझ्या सोबतीला. घरच्या मंडळींना घेवून लागलो कामाला. दिड दोन वर्षात आमच्या सोळा एकर जमिनीपैकी बारा एकर जमिनीत मोठय़ा हिम्मतीने दगड काढून गाळाची शेकडो ट्रक्टर माती आणून टाकली आणि शेतीयोग्य जमिन केली. खालच्या बाजूला ओढा आहे तिथे विहीर खोदली. कृषी विभागाच्या मदतीने शेततळे खोदले, त्याच्या तांत्रिक बाजू सगळ्या मजबूत करुन विहीर आणि कूपनलिका मध्ये जे पाणी असेल ते यात घेतल. शेती करायला घेतली. रक्त ओतून केलेल हे काम दोन वर्षांपूर्वी फळाला आल. रोजगार हमी योजनेची मदत घेवून डाळींब लावल. आंतरपीक म्हणून आलं घेतलं. टोम्याटोचा प्लॉट लावला. आलं झालं पाच लाखाच आणि टोम्याटोही चार एक लाखाचा झाला आणि जिंदगानीच चांगभलं झालं. यावर्षी फक्त अडीचशे मिलीमीटर पाऊस होवूनही माझ्या पिकाला पुरेल एवढं पाणी माझ्याकडे आहे, ते पुरवून ठिबकच वापरतो.हे सगळ सांगताना कधी आसू तर कधी हसू रामचंद्ररावांच्या चेहऱयावर होते. या माणसाच्या कष्टाच मोल त्याच्या हास्यात होते. माझ्याकडून शब्दात केलेल कौतुक त्यांच्या चेहऱयावरच हास्य गुलाबी करण्यापुरतचं होत.

Post a Comment

 
Top