0
 दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्याने 1984 पासून माणसांच्या जीवनात करमणुकीचे एक खास दालन निर्माण केले होते. या दूरदर्शनवरील रामायण, महाभारत मालिकांनी इतिहास घडवला होता. ज्या दूरदर्शनसमोर क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी दिवस दिवस घालवले. ज्या दूरदर्शनच्या पडद्याने कित्येक वर्षे मराठी मोठय़ा शहरांसह खेडोपाडय़ातील माणसांची करमणूक करतानाच देशपरदेशातील घडामोडी पोहोचवल्या होत्या, त्या दूरदर्शनचे येथील अजिंक्यताऱयावर उभारण्यात आलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र 17 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. दरम्यान, ज्या दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रावरून सातारा आकाशवाणी केंद्र, एफएमचे प्रक्षेपण होत आहे ते प्रक्षेपण मार्च अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येथील प्रक्षेपण केंद्रांवर टांगती तलवार कायम आहे.
  रविवार 8 जून 1986 रोजी साताऱयातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर तत्कालीन माहिती व प्रसारण राज्यमंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते व  राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार प्रतापराव भोसले व आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित सातारा दूरदर्शन प्रक्षेपण उपकेंद्राचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून केंद्राचा तो भव्य मनोरा सर्वांचे लक्ष वेधून होता. या केंद्रामुळे अँटीनाद्वारे सातारा जिल्हय़ातील नागरिकांना दूरदर्शन पाहण्याचा आनंद घेता आला.
  बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने मनोरंजनाची साधने एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. कदाचित म्हणूनच बदलत्या काळातील या तंत्रज्ञानाने आता कधी काळी प्रत्येकाची जिव्हाळ्याची असलेली दूरदर्शन प्रक्षेपण उपकेंद्र बंद होण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या प्रसार भारतीने साताऱयासह राज्यातील 43 तर देशभरातील 272 दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अँटीनाद्वारे दिसणारी दूरदर्शनची सेवा बंद होणार असून, प्रेक्षकांना खासगी डीटीएच सेवांकडे वळावे लागणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रसार भारती बोर्डाच्या निर्णयानुसार येत्या 31 जानेवारीपासून येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या प्रक्षेपण केंद्रांवरून प्रसारित होणारी डीडी नॅशनल, डीडी सह्याद्री तसेच डीडी न्यूज या मोफत मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱया दूरदर्शनच्या वाहिन्यांचे प्रक्षेपण उपलब्ध होणार नाही. प्रसार भारतीकडून असे अचानक प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला याविषयी येथील प्रक्षेपण केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांना प्रश्न पडला आहे. 
1986 पासून अजिंक्यतारा किल्ल्यावर दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र सुरू करण्यात आले होते. आज येथे मुख्य अभियंता, टेक्निशन्स व सुरक्षा रक्षक असे सात कर्मचारी कार्यरत आहेत. हजारो, कोटी रुपये खर्च करून हे प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले आहे. आज खासगी केबल, डीटीएचचे जाळे वाढले आहे, तरी गेली 32 वर्ष या प्रक्षेपण केंद्रांवरून प्रसारित होणारे दूरदर्शनचे अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम मोफत पाहण्याचा आनंद सातारा जिल्हावासियांना घेता आला.

दूरदर्शनही होणार सशुल्क
गेल्या काही वर्षांत शहर तसेच ग्रामीण भागात खासगी केबल सेवा, डीटीएचचे जाळे पसरले. दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग रोडावत गेला. या प्रक्षेपण केंद्रांना देखील उतरती कळा लागली. अँटीना संपले आणि ही केंद्रेही संपली. कदाचित खासगीकरण धोरणाकडे केंद्र शासनाचे झुकते माप असल्यानेच याच धोरणांचा बळी दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ठरत असल्याचे बोलले जात आहे. येणाऱया काळात दूरदर्शनच्या मोफत वाहिन्यांसाठी देखील पैसे मोजावे लागू शकतात, अशी चिन्हे आहेत.

मालिकांनी घडवला होता इतिहास
दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्याने अनेक हिरो, हिरॉईन हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्या दूरदर्शनवरील रामायण, महाभारत, चंद्रकांता, टिपू सुलतान, राजा शिवाजी या मालिकांनी इतिहास घडवला होता. एक शुन्य शुन्य, शक्तीमान, अलिफ लैला, झोपी गेलेला जागा झाला, छायागीत या कार्यक्रमांना रसिकांना गीतसंगीताबरोबर हसण्याचा आनंद दिला होता. तर कार्टून फिल्सने छोटय़ांच्या जीवनात रंगत वाढवली होती. मात्र, हे दूरदर्शन सध्या विविध वाहिन्यांच्या स्पर्धेत इतिहास जमा होत असून त्याचा इतिहास मात्र नेहमी ज्या पिढय़ांनी त्याचा आनंद घेतला त्यांच्या स्मरणात कायम राहील.

Post a Comment

 
Top