0
 • नागपूर - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करांनी वाहनाची धडक देऊन थेट पोलिस उपनिरीक्षकालाच ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. छत्रपती चिडे असे मृताचे नाव होते. दरम्यान, चिडे यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


  चंद्रपुरात दारूबंदी आहे. मात्र, या भागात दारू तस्करीचे अनेक प्रकार समोर आले. चिडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ ते चार जणांच्या पथकासह दारू तस्करीविरोधी गस्त घालण्यास निघाले होते. दरम्यान, दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचे वाहन ढोरपामार्गे मौशी चोरगावजवळ आल्यावर चिडे व सहकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडीचा वेग वाढवत थेट चिडे यांच्या अंगावरच घालण्याचा प्रयत्न केला. यात चिडेंना धडक बसली. दारू तस्कर लागलीच तेथून गाडीसह पसार झाला. यात चिडे गंभीररित्या जखमी झाले. सहकाऱ्यांनी चिडेंना ब्रह्मपुरी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
  चिडेंना नुकताच उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
  या घटनेमुळे चंद्रपूर पोलिस दलात खळबळ माजली आहे. पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांनी काही दिवसांतच आपल्या कामगिरीची चमक दाखवली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला होता. याची दखल घेत नुकताच त्यांना उत्कृष्ट पोलिस अधिकारी म्हणून गौरवण्यात आले होते. आमचे पोलिस पथक दारूची तस्करी रोखण्याच्या मोहिमेवर होते. त्याच वेळी ही घटना घडली, अशी माहिती चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

  ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

  • Police Sub Inspector death in car Accident in Nagbhid at Chandrapur

Post a Comment

 
Top