नाशिक/ नगर - दुष्काळी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी साेडण्याच्या निर्णयावर स्थगिती मागणारी नगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. त्यामुळे अाता नगर व नाशिकच्या धरणांतून जायकवाडीत ८.९ टीएमसी पाणी साेडण्याचा मार्ग माेकळा झाला. दरम्यान, काेर्टाचा निर्णय जाहीर हाेताच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर यांनी २३ ऑक्टोबरच्या अादेशानुसार पाणी साेडण्याचे अादेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी पाेलिस बंदाेबस्तात पाणी साेडण्यास प्रारंभ हाेणार अाहे. विखे पाटील साखर कारखान्यासह ३६ जणांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. ती निकाली काढताना न्यायालयाने ‘हा महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत प्रश्न असल्याने तो उच्च न्यायालयात सोडवावा,’ असा सल्ला दिला. उच्च न्यायालयाने यापूर्वीच पाणी साेडण्यास स्थगिती देण्यास नकार दिलेला अाहे. तसेच दिवाळीनंतर पुढील सुनावणीसाठी तारखा दिलेल्या अाहेत. त्यामुळे आता ऊर्ध्व गोदावरीतील निळवंडे, भंडारदरा, दारणा, गंगापूर आणि पालखेड या धरणांतून जायकवाडीत पाणी साेडणे बंधनकारक ठरणार अाहे.
या धरणांतून साेडणार पाणी : नाशिकमधील गंगापूर, पालखेड आणि दारणा समूहात मिळून ३.२४ टीएमसी पाणी गुरुवारी सकाळी १० वाजता जायकवाडीसाठी साेडण्यात येईल, तर नगरच्या निळवंडे धरणातून २ हजार क्युसेकने पाणी साेडले जाईल. नंतर ८ ते १० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात येईल. भंडारदरा लाभक्षेत्रात सिंचनाच्या आवर्तनात कोणताही बदल केलेला नाही. बुधवारी भंडारदराचे वक्राकार दरवाजे उचलून १८०० क्युसेकने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले. दरम्यान, साेडलेल्या पाण्याची चाेरी हाेऊ नये म्हणून पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात अाला अाहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment