औरंगाबाद- राफल विमानाची नेमकी किंमत किती, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी 670 कोटी रुपये असे लेखी उत्तर दिले. मग मोदी तेच विमान 1670 कोटींच्या दराने खरेदी करतात. हे कसे काय होऊ शकते. हा किक बॅकचा प्रकार आहे. म्हणजे पैसे परत आपल्याच खिशात आणण्यात आल्याचे दिसते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. चौकशी झाली तर सगळेच तुरुंगात जातील, असेही ते म्हणाले. गुरुवारी सकाळी त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या.
चव्हाण म्हणाले, मी 2004 मध्ये पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असताना राफेल विमान खरेदी व्यवहाराची आपल्याला माहिती होती. खरेदी युरोत असल्याने त्याची किमत त्या काळात 550 ते 660 कोटींच्या आसपास होती. रुपयाचे अवमूल्यानामुळे त्यात काहीसा बदल अपेक्षित होता. परंतु ती थेट तिप्पट वाढणे शक्यच नव्हते. शस्त्र खरेदीचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी पंतप्रधानांसह पाच प्रमुख मंत्र्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची मान्यताही घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात अनिल अंबानी यांनी विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती करण्याची एक कंपनी स्थापन केली आणि एप्रिलमध्ये मोदींनी संरक्षणमंत्री किंवा अन्य कोणालाही विश्वासात न घेता राफेल खरेदीचा करार केला. मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाण्याच्या एक दिवस आधी परराष्ट्र खात्यातील सचिवाने म्हटले होते की, असे व्यवहार पंतप्रधान करत नाहीत. तरीही परराष्ट्र, संरक्षण मंत्री नसताना मोदींनी व्यवहार केला.
भाजप 180 पर्यंतच थांबेल
आगामी लोकसभेत भाजपला बहुमत मिळणार नाहीच. त्यांच्या जागा 160-180 पर्यंतच थांबतील, असा दावा चव्हाण यांनी केला. ज्या हिंदी भाषिक राज्यात (काऊ बेल्ट) भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना 89 टक्के जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग आणि माया एकत्र आले तर नक्कीच भाजपला मोठा फटका बसेल. बिहारमध्ये नितीशकुमारविषयी नाराजी तर लालूविषयी सहानुभूती आहे. याचा अंदाज मोदींना आहे. त्यामुळे पैशाचा वापर होईल. महागठबंधन होणार नाही, यासाठी आमिषे दाखवले जातील, तुरुंगात घालण्याची भीती दाखवली जाईल. धार्मिक ध्रुवीकरण केले जाईल. धार्मिक स्थळे तसेच व्यक्तींवर खोटे का होईना हल्ले होतील, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली.

Post a Comment