0
ग्रामीण पोलिसांनी तयार केले सेफ ड्राइव्ह अॅप; ३४ ब्लॅक स्पॉट, ७५ अपघात स्थळांची माहिती,
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून ग्रामीण पोलिसांनी सेफ ड्राइव्ह अॅप तयार केले आहे. वाहन चालवताना ५०० मीटरपूर्वीच हे अॅप पुढे अपघातस्थळ असल्याचा व्हाॅइस मेसेज देणार आहे. याशिवाय जवळचे रस्ते, हॉस्पिटल, पोलिस ठाणे, एटीएम, रुग्णवाहिका यांचीही माहिती देणार आहे. अँड्रॉइड मोबाइलधारकांना गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येईल, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

या अॅपमध्ये जिल्ह्यातील ३४ ब्लॅक स्पॉटची माहिती देण्यात आली अाहे. जिल्ह्यातील ज्या महामार्गावर अपघात होऊ शकतो अशा ७५ स्थळांची माहितीही देण्यात आली आहे. वळण, घाट, क्रॉसिंग याची माहिती आधीच मिळाल्यास वाहन चालकांना गतीवर नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, हा यामागचा हेतू आहे. पोलिस अधीक्षक आरती सिंह आणि वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बी. डी. फुंदे यांनी हे अॅप तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

चालकाला दोन भाषांत मिळणार व्हॉइस मेसेज 
अॅप डाऊनलोड केल्यानंतर अपघात स्थळाच्या पूर्वी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांत व्हॉइस मेसेज येईल. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ३०० लोकांचा अपघातात बळी जातो. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे यातील बहुतांश अपघात होतात. मात्र, अशा प्रकारे अपघात स्थळांची माहिती अगोदरच मिळाल्यास चालक सावधान होतील.

वारंवार अपघात होणारे औरंगाबाद जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट असे 
फुलंब्री : सावंगी फाटा, चौका घाट, गणोरी फाटा, पालघाट, वानेगाव. 
वडोदबाजार : नायगाव फाटा, बाभूळगाव फाटा, चिंचखेडा फाटा, पानस फाटा. 
सिल्लोड ग्रामीण : भवन, पालोद फाटा. 
अजिंठा : अजिंठा, लिहाखेडी फाटा, गोळेगाव फाटा, पानस फाटा. 
पैठण : आदित्य हॉटेल, आखातवाडा, सोनवाडी. 
गंगापूर : ढोरेगाव, भेंडाळा फाटा, नवीन कायगाव. 
खुलताबाद : कागजीपुरा, नांद्राबाद फाटा, औरंगाबाद नाका, वेरूळ घाट, पळसवाडी फाटा, गल्लेबोरगाव फाटा, सुलतानपूर बसस्टँड, कान्होरी फाटा, माथेरान हॉटेल. 
कन्नड शहर : हतनूर फाटा, पाणपोई फाटा, अंबाडी धरण, गुरू ढाबा, नवीन कायगाव. 
शिल्लेगाव : आलापूर फाटा. 
पाचोड : सुकलामा धाबा, दाभरूळ.Aurangabad police safe drive app

Post a comment

 
Top