0
पावणे एमआयडीसीमधील एक लाख 33 हजार चौरस मीटर जागा हडप करून तिथे उभ्या करण्यात आलेल्या बावखळेश्वर मंदिर एमआयडीसी प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. दोन दिवस चाललेल्या या कारवाईमुळे हा 400 कोटी रुपये किमतीचा भूखंड पुन्हा एमआयडीसीच्या ताब्यात आला आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या मंदिरावर कारवाई करण्यासाठी एमआयडीसीत गेले दोन दिवस तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आज कमी करण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्या गराडय़ात अडकलेल्या पावणे परिसराने आज मोकळा श्वास घेतला.
कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी  उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत वकिलांची फौज उभी करण्यात आली. मात्र सर्वच धडपड निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी एमआयडीसीने प्रचंड पोलीस बंदोबस्तात बावखळेश्वर परिसरातील तीन मंदिरांवर बुलडोझर चालवला. या मंदिराच्या नावाखाली हडप करण्यात आलेली सुमारे 32 एकर जागा पुन्हा एमआयडीसीच्या ताब्यात आली. आजच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत सुमारे 400 कोटी रुपये आहे.
राजकीय अस्तित्वाला सुरुंग
गणेश नाईक हे आघाडी सरकारच्या काळात दहा वर्षे मंत्री होते. नवी मुंबई महापालिकेची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याच वर्चस्वाखाली आहे. एवढे सर्व असूनही नाईक यांना आपले अनधिकृत साम्राज्य वाचवण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व फक्त धोक्यातच आले नाही तर त्याला सुरुंग लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जोरदार खळबळ उडाली आहे.

Post a Comment

 
Top