यावल- शहरातील विस्तारित भागामध्ये कुलूप लावून बंद असलेली घरे पुन्हा चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. विस्तारित भागातील आयशा नगरमध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एका घराला टार्गेट करीत 40 हजाराच्या रोकडसह सुमारे सोने-चांदीची दागिने लांबविली. जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. घरफोडी गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
आयेशा नगरमध्ये जमील खान रुस्तम खान उर्फ गोंडू पेंटर हे राहातात. बुधवारी सायंकाळी सावदा येथील त्यांच्या एका नातेवाइकाचे अपघाती निधन झाले. अंत्यविधीसाठी गोंडू पेंटर आपल्या कुटुंबासह सावदा येथे गेले होते. पेंटर यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी आपला हात साफ केला. गुरुवारी सकाळी शेजारच्यांना घर उघडे व कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी गोंडू पेंटर या निरोप पाठवला. त्यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार आणि सोने-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समजले.
पेंटर यांनी पोलिस स्टेशनला ही माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार शेख असलम, जाकिर सय्यद, नगरसेवक राकेश कोलते यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील विस्तारित भागामध्ये बंद घरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या भागांमध्ये रात्रीची गस्त पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Post a comment