0
कणकवली पोलिसांनी शुक्रवारी तालुक्यात दोन ठिकाणी गोवा बनावटीची दारू जप्त केली. यात महामार्गावरील जानवली येथे स्वीफ्ट कारचा पाठलाग करून 37 हजार 370 रुपयांची, तर घोणसरी – टेंबवाडी येथे एका महिलेकडून एक हजार 360 रुपयांची दारु जप्त करण्यात आली.
कॉन्स्टेबल संदेश दीक्षित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घोणसरी-टेंबवाडी येथील सौ. जॉनीत जोसेफ रैस (35) ही गोवा बनावटीची दारुसह आढळून आली. तिच्याकडून एक हजार 360 रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
फिर्याद हवालदार बाळू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,  जानवली दरम्यान एक स्वीफ्ट कार (एमएच 04-ईएफ-6223) वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. संशय आल्याने पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कारचालकाने कार अधिक वेगाने पळविल्याने पोलिसांनी आपल्या वाहनाने कारचा पाठलाग केला. काही अंतरावर ‘ओव्हरटेक’ करून कार थांबवली. कारची तपासणी केली असता आत 37 हजार 370 रुपयांची दारू आढळून आली. पोलिसांनी दारुसह कारही जप्त करीत चालक सागर समीर साबळे (21, शिवतर – सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये उपनिरीक्षक पी. एन. कदम, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, व्ही. एम. चव्हाण, हवालदार बाळू कांबळे, कॉन्स्टेबल सलीम सय्यद, संदेश दीक्षित, महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक सहभागी झाले होते.

Post a Comment

 
Top