अहमदाबाद - गुजरातच्या गीर अभयारण्यात विषाणूच्या संसर्गात १७ सिंह मृत्युमुखी पडल्यानंतर तेथून सुटका केलेल्या ३६ सिंहांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, पण त्यांना आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, अशी माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. अमरेली जिल्ह्यातील गीर वन विभागाच्या दालखानिया परिक्षेत्रात कॅनाइन डिस्टेम्पर व्हायरसचा (सीडीव्ही) संसर्ग झाला होता. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यात तेथील २३ पैकी १७ सिंहांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातून ३६ सिंहांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या या सिंहांना राज्य वन विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या तीन वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आले आहे. सीडीव्हीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांना लस दिली जात आहे.
याबाबत माहिती देताना जुनागढ येथील मुख्य वन संरक्षक दुष्यंत वासवादा म्हणाले की, ‘सप्टेंबरअखेरपासून सिंहांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. या सिंहांना तीन आठवड्यांच्या अंतराने बुस्टर डोस देण्यात येत आहेत. लस विविध टप्प्यांत दिली जात आहे. ती एका डोसमध्ये दिली जात नाही. एकदा का टप्पा पूर्ण झाला की मग त्यांना पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी पाठवायचे की नाही याबाबत विचार केला जाईल. त्यानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल. लसीकरण प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत.’ गीर अभयारण्यातील एका विशिष्ट भागात २३ सिंह मृतावस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावरून राज्य सरकार अडचणीत आले होते. या २३ सिंहांपैकी १७ सिंहांचा मृत्यू सीडीव्हीच्या संसर्गामुळेच झाला होता, या वृत्ताला चाचण्यांतून दुजोरा मिळाला होता.पूर्व आफ्रिकेतील ३० टक्के सिंह विषाणूचे बळी
सीडीव्ही हा धोकादायक विषाणू मानला जातो. पूर्व आफ्रिकेतील जंगलांतील सिंहांच्या एकूण संख्येपैकी ३० टक्के सिंहांचा मृत्यू या विषाणूच्या संसर्गामुळे झाल्याचे म्हटले जात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment