0

भारतातून 38 हजार, आशियातून 8 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 हजार छायाचित्रातून मारली बाजी .  

औरंगाबाद - अाैरंगाबाद येथील जागतिक कीर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी राजस्थानमधील ताल छापर अभयारण्यात काढलेल्या ‘डेथ आॅन विंग्ज’ या छायाचित्राला देश, आशिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन पुरस्कार मिळाले अाहेत. हरणाच्या पिलाची शिकार करणाऱ्या गरुडाच्या या छायाचित्राने भारतातून ३८ हजार, आशियातून ८ हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ हजार छायाचित्रातून बाजी मारली.     बैजू यांना नुकताच देशात येस बँकेकडून फोटोग्राफर ऑफ द इअर, आशियात सेंच्युरी एशियातर्फे वाइल्डलाइफ फोटोग्राफी अवॉर्ड आणि डी.जे. मेमोरियलकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. राजस्थानातील ताल छापर हे अभयारण्य मुख्यत: हरिण मोठ्या प्रमाणात आढळतात. हरणाच्या दोन दिवसाच्या पिलाची गरुड शिकार करत असतानाचा क्षण बैजू यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. हे छायाचित्र मार्च २०१७ मध्ये काढण्यात आले. हे छायाचित्र टिपण्यासाठी बैजू यांना तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. दरवेळी चार-पाच दिवस प्रतीक्षा करूनही असा क्षण कॅमेऱ्यात बंद करता आला नाही. या छायाचित्राबद्दल बैजू पाटील म्हणाले की, हरिणाच्या पाठीमागे तिचे पिल्लू धावत होते. आकाशातून गरुडाचे लक्ष त्या पिलाकडेच होते. हरिणाचा वेग जास्त असल्याने पिल्लू आणि त्याच्या आईमध्ये बरेच अंतर होते. तितक्यात गरुडाने पिलावर झडप घातली व पंजात धरून पिलाला उचलण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. हरणाने मागे वळून गरुडाचा प्रतिकार केला व पिलाला वाचवले. ‘सेंच्युरी एशिया’ या मासिकाकडून नुकतेच मुंबईतील रॉयल ओपेरा हाऊसमध्ये सेंच्युरी एशियाच्या उर्वी परिमल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी मासिकाचे संपादक बिट्टू सहेगल उपस्थित होते. बैजू यांना आजवर वन्यजीव छायाचित्रणात १७५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्टमध्ये सुवर्णपदकही त्यांनी पटकावले आहे.Baiju's 'Death on Wings' 3 Awards


Post a Comment

 
Top