0
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात पावसाळ्यातील एक-दोन मोठय़ा स्वरुपातील दमदार पाऊस वगळता, मान्सूनसह परतीच्या मान्सूननेही चांगलीच हुलकावणी दिली. जून महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने या भागातील पाण्याची पातळी वाढण्यास चांगली मदत झाली होती. तसेच खरीपात रिमझिम पावसाने हंगामातील पिकांच्या पाण्याची सोय झाली. मात्र, तालुक्यातील विविध गावात रब्बी हंगामातील पिकांसाठी वरदान ठरणाऱया तलावांची सध्या पाणीसाठय़ाअभावी बिकट अवस्था आहे. तालुक्याच्या उत्तरभागासह अनेक गावांना वरदान असणाऱया नेर तलावातील केवळ 25 टक्के म्हणजे, 125 दशलक्ष घनफूट व दरुज तलावातील 18 दशलक्ष घन फूट इतका पाणीसाठा या महिन्यापर्यंत झाला आहे, तर येळीव व शिरसवडी या दोन तलावांत नाममात्र पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या हस्त नक्षत्र सुरु असून यात पडणाऱया दमदार पावसांकडे या भागातील शेतकऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.                    
यावर्षी उन्हाळ्यात तालुक्यातील बहुतांशी भागात समाधानकारक मुसळधार पाऊस न पडल्याने या तलावात पाणीसाठा होऊ शकला नाही. परिणामी तलावातील पाण्यावर अवलंबून असणारे शेतीक्षेत्र, तसेच गावोगावच्या पाणी योजना पाणीसाठय़ा अभावी अडचणीत येऊ शकतात. डिस्कळ, मोळ, बुध, ललगुण,  राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी या भागात मोठय़ा पावसामुळे येणाऱया पुरामुळे तलावाच्या पाणीसाठय़ात वाढ होत असते. यावर्षी खटाव तालुक्यात तलाव परिसरातील क्षेत्रात तुलनेने मोठय़ा स्वरूपातील वळीव पाऊस कमी पडला तसेच तलावाच्या वरील भागात मोठय़ा प्रमाणात जलसंधारण, जलयुक्त शिवार व वॉटर कपच्या माद्यमातून मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे नेर व दरूजतलावात आजमितीला केवळ अल्प पाणीसाठा झाला आहे. अपवाद वगळता काही भागात हलका पाऊस होत असला तरीही तलावात पाणीसाठा होण्यासाठीचा दमदार पाऊसाची नितांत गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्यासह रोहीणी, मृग नक्षत्रात, तसेच सध्याच्या हस्त नक्षत्रात पावसाने अद्याप फारशी समाधानकारक कामगिरी दाखवली नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.         
या तलावातून पुसेगाव, विसापूर, फडतरवाडी, शिंपीमळा, बुध, डिस्कळ, वेटणे यासह अनेक गावांत पिण्याच्या पाणी योजना कार्यान्वीत आहेत. परंतू आजमितीच्या उपलब्ध पाणीसाठय़ाचा विचार करता या भागातील जनतेला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार असल्याची शक्यता निर्माण झली आहे
नेर तलाव 1886 साली पूर्ण झाला असून पाणीसाठवण क्षमता 11.87 दश लक्ष घन मीटर (416.40 दशलक्ष घनफूट) ऐवढी असून 650 हेक्टर जमीन क्षेत्रात तलाव आहे. या तलावाचे उद्घाटन राणी व्हिक्टोरिया यांच्याहस्ते झाले होते. पुसेगाव, खटाव, कुरोली सिध्देश्वरसह येरळवाडीपर्यंच्या जनतेसाठी महत्वाचा असलेला हा तलाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यावर या पाण्यावर खरीप व रब्बी हंगामातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते; मात्र चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा  अद्याप तरी न झाल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Post a Comment

 
Top