0
 • Polling for 119 seats for the second time in Telangana on 7th Decemberहैदराबाद - स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतर तेलंगणात दुसऱ्यांदा ११९ जागांवर ७ डिसेंबरला मतदान होईल. एकूण १,७६१ उमेदवार मैदानात आहेत. सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) सर्व ११९ जागा लढवत आहे. काँग्रेस महाआघाडीसोबत १०० जागांवर लढत आहे. त्याचा सहकारी पक्ष तेदेप १३ आणि टीजेएस व भाकप ३-३ जागांवर मैदानात आहेत. भाजप स्वबळावर ११८ जागा लढवत आहे. जुन्या शहरात दबदबा असणारा एआयएमआयएम या वेळी ७ ऐवजी ८ जागांवर नशीब आजमावत आहे. लहान पक्षांची बहुजन डावी आघाडी ११९ तर राष्ट्रवादी पक्ष फक्त २ जागांवर लढत आहे. या निवडणुकीत टीआरएसची थेट लढत महाआघाडीशी आहे. भाजपला तेलंगणमध्ये पूर्ण जोर लावावा लागत आहे. गेल्या निवडणुकीत ६३ जागा जिंकणाऱ्या टीआरएसला ३४.३% मते मिळाली होती. २१ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला २५.२% तर १५ जागा जिंकणाऱ्या तेदेपला १४.७% मते मिळाली होती.

  ६ महिन्यांपूर्वी विधानसभा बरखास्त करून निवडणुकीत उतरलेल्या टीआरएसचा एकमेव मोठा चेहरा म्हणजे केसीआर. आमचा पक्ष सत्तेत परतला नाही तर कल्याण योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार नाही, असे ते उर्दूमिश्रित तेलगूत मतदारांना समजावत आहेत. आयटीमंत्री राहिलेले त्यांचे पुत्र तारक रामाराव, खासदार कन्या कविताही जिल्हा स्तरावर सभा घेत आहेत. काँग्रेसकडे सध्या तरी लोकांना प्रभावित करू शकेल, असा मोठा चेहरा नाही. इतिहासात प्रथमच राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू हे सोबत निवडणूक सभा आणि रोड शो करतील. भाजप नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या बळावर प्रचारात 
  उतरला आहे.
  टीआरएसने सर्वाधिक तिकिटे दिली रेड्डींना, तर भाजपने मागासांना 
  तेलंगणमध्ये २ कोटी ८० लाख ६४ हजार ६८० मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख ६४ हजार ७७ मतदार प्रथमच मतदान करतील. ५१% पेक्षा जास्त मतदार मागास जातींचे आहेत. अनुसूचित जाती १७%, अनुसूचित जमाती ९% आणि अल्पसंख्याक १२% आहेत. इतर जाती २१% पेक्षा जास्त आहेत. राज्यात मागासांची जास्त संख्या असूनही भाजपव्यतिरिक्त कुठल्याही पक्षाने त्यांना प्राधान्य दिले नाही. भाजपने मागास जातीचे सर्वाधिक ३४, टीआरएसने २७, काँग्रेसने २४ उमेदवार उतरवले आहेत. येथील राजकारणात रेड्डी समुदायाचे वर्चस्व राहिले आहे. टीआरएसने ५६ मतदारसंघांत रेड्डी व वेल्मा समुदायाला तिकिटे दिली आहेत.
  यंदा स्वतंत्र राज्य नाही; वीज, पाणी आणि तांदूळ ठरले प्रचाराचे मुद्दे 
  या वेळी स्वतंत्र राज्याचा मुद्दा नाही. घराणेशाही, जातीयवाद, वीज, शेतकऱ्यांना पाणी, गरिबांना स्वस्त तांदूळ यांसारखे मुद्दे प्रभावी ठरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये विकास फक्त कुटुंबापर्यंत मर्यादित राहिला आहे, असा आरोप करत विरोधी पक्ष घराणेशाहीला मुद्दा करत आहेत. दलित मुख्यमंत्री न करणे, सिंचन योजनांच्या नावावर घोटाळा, अल्पसंख्याकांना आणि आदिवासींना १२% आरक्षण न देणे यांसारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस टीआरएस सरकारला नरेंद्र मोदींचे बाहुले संबोधत आहे. कोणत्या सरकारने आजपर्यंत २४ तास वीज दिली आहे, असा प्रश्न चंद्रशेखर राव प्रचार सभांत करतात.

Post a Comment

 
Top